#महिला_दिन_विशेष : सामाजिक दातृत्वाची अनोखी “तृप्ती’

बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरे जात सौ. तृप्ती उबाळे या पोलीस दलात अधिकारीपदावर विराजमान झाल्या आहेत. बिनतारी संदेश विभागाच्या पुणे मुख्यालयात अप्पर पोलीस महासंचालकांच्या सहाय्यक म्हणून त्या काम पाहत आहेत. नोकरीबरोबर सामाजिक बांधिलकी जपत पती रमेश उबाळे यांच्याबरोबर दरवर्षी दहा मुलांना दत्तक घेऊन, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडत आहेत. रमेश उबाळे यांच्या श्री बालाजी उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून तो यशोशिखरावर नेण्यामध्ये सौ. तृप्ती यांचाही तोलामोलाचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा….

ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील नवलोबा उबाळे तथा सावकार यांच्या घरात रमेश यांचा जन्म झाला. उद्योजक होण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. शालेय शिक्षणानंतर स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्याच वेळी तृप्ती कुलकर्णी या अभियांत्रिकी क्षेत्रात दाखल झाल्या होत्या. महाविद्यालयीन जीवनात ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या सौ. तृप्ती रमेश उबाळे झाल्या. साताऱ्याजवळ शाहूपुरीत एका छोट्या खोलीत त्यांचा संसार सुरू झाला. तेथेच श्री बालाजी उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

रमेश उबाळे यांनी अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र व मध्य प्रदेशात काही काळ नोकरी केली. त्यानंतर साताऱ्यात स्वत:चा बांधकाम व्यवसाय सुरू केला. कार्यालय सांभाळणे, लहान मुलाला शाळेत नेणे-आणणे आदी कामे सौ. तृप्ती करू लागल्या. त्यांना शासकीय सेवेत करिअर करायचे होते. रमेश यांच्या पाठबळामुळे त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला. त्यात नेत्रदीपक यश मिळवत त्या पोलीस दलात रुजू झाल्या.

9 वर्षे त्या कार्यरत असून, गेली 8 वर्षे कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य पार पाडत आहेत. करोना काळात पुण्यात जायला कोणीही धजावत नव्हते, त्या काळात सौ. तृप्ती कर्तव्यावर हजर असायच्या. कार्यालयातील अनेक जण करोनाबाधित झाले, तरी त्यांनी दररोज कार्यालयात उपस्थिती ठेवली. त्याबद्दल उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. परिस्थितीमुळे जी मुले शिक्षणापासून वंचित राहतात, त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, असे सौ. तृप्ती यांनी बोलून दाखविले. त्यावर रमेश उबाळे यांनीही अशा मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

हे दाम्पत्य दरवर्षी दहा मुलांना दत्तक घेऊन शिक्षण देत आहे. एकमेकांना साथ देत उबाळे दाम्पत्याने अल्पावधतीच विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सुट्टीदिवशी सौ. तृप्ती या बालाजी उद्योग समूहासाठी वेळ देतात. या दाम्पत्याची सचोटी आणि वक्तशीरपणामुळे बालाजी कन्स्ट्रक्‍शनचे नाव झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार होणे, अशक्‍यप्राय होते; परंतु सातारा जिल्ह्याचे सुपुत्र उदय देशमुख यांनी शेंद्रे येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात अडचण होती, ती अद्ययावत तंत्रज्ञानाची. सैनिकी शाळेत शिक्षण घेतलेल्या देशमुख यांनी उबाळे दाम्पत्याच्या बालाजी कन्स्ट्रक्‍शनकडे या बांधकामाची जबाबदारी दिली.

उबाळे यांनीही कमीत कमी कालावधीत दर्जेदार बांधकाम केले. जैतापूर येथील महाविद्यालय, लक्ष्मीनारायण संकुलाची उभारणीही या समूहाने केली आहे. दोघेही स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी असल्याने पर्यटनाला जाताना, सातारा किंवा पुण्यात फिरताना बांधकाम सुरू असलेले दिसले की, बांधकाम साहित्याची टंचाई आणि दर्जा यावर चर्चा व्हायची. मनुष्य स्वत:चे घर बांधण्यासाठी आयुष्यभराची पुंजी लावतो, त्याला दर्जेदार घर मिळाले पाहिजे, यासाठी दोघांनी परिश्रम घेतले. त्यांच्या कल्पनेतून श्री बालाजी केमिकल्स या फर्मचा श्रीगणेशा झाला. या माध्यमातून वाळू-सिमेंटचे रेडिमिक्‍स नावाचे मिश्रण विकसित केले. बांधकाम व्यवसायातील यशानंतर सौ. तृप्ती यांच्या प्रेरणेतून रमेश यांनी हॉटेल व्यवसायाचा श्रीगणेशा केला. कास पठारावर तिरुपती हिल्स हे हॉटेल उभारले.

कास-बामणोली, ठोसेघर-उरमोडी धरण परिसरात येणारे पर्यटक आर्वजून या हॉटेलला भेट देतात. ल्हासुर्णेसह जिल्ह्यातील अनेकांना उबाळे दाम्पत्याने रोजगार दिला आहेत. ल्हासुर्णे येथे विविध मंदिरांच्या उभारणीत तांत्रिक मार्गदर्शन करत, मसाईदेवी मंदिराच्या छताचे काम पूर्णत्वास नेले आहे. व्यवसायाबरोबरच सौ. तृप्ती यांच्या प्रेरणेने रमेश उबाळे यांनी समाजकारणात स्थान निर्माण केले आहे. कोरेगाव तालुक्‍यातील विविध प्रश्न त्यांनी सोडविले आहेत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी या नात्याने ते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा करत आहेत. महिन्यातून दोन-चार वेळा मुंबईच्या वाऱ्या करत रमेश उबाळे यांनी मंत्रालय स्तरावर अनेक विषय हातवेगळे करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.