#महिला_दिन_विशेष : तिच्या जगण्याची लढाई…!

जागतिकीकरणाच्या काळात महिला वर्ग आज पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे टाकून सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र आहे. हे चित्र दिसण्यासाठी महिलांना मोठा संघर्ष करावा लागला. तो संघर्ष आजही करावा लागत आहे. तिने मारलेली भरारी कौतुकास्पद आहे; परंतु तिचा संघर्ष आजही जारी आहे. तिच्या जगण्याची लढाई आजही सुरुच आहे….

संसाराच्या रथाला दोन चाके असतात. त्यातील प्रत्येक चाक महत्त्वाचे असते. हे कागदोपत्री खरे असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात एक चाक साऱ्या जगभर दुय्यमच मानले गेले. म्हणजेच जगभरातील पुरुषसत्ताक संस्कृतीत महिलांना नेहमी उपेक्षित स्थानच देण्यात आले. त्यांना कोणतेही अधिकार मिळू नयनरम्य त असेच प्रयत्न केले गेले. त्यांचे हक्क डावलले गेले. त्यामुळेच महिलांना अधिकार मिळावेत, हक्क मिळावेत यासाठी अनेक लढे झाले. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदतील सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्‍चित करण्यात आला.

जगभराचा इतिहास पाहिला तर अनेक देशांमध्ये पुरूषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला नेहमीच दुय्यम लेखले आहे. त्यात वर्तमानकाळातही फारसा बदल झालेला नाही. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ती विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करू लागली, तरीही तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झालेला नाही. भविष्यकाळात तरी तिला सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

दरवर्षी महिला दिन साजरा होतो. महिला दिनी तिचा कौतुकसोहळा होतो; परंतु इतर दिवशी तिच्या पदरी अवहलेनाच पडते. महिला दिन केवळ एक दिवस नको, तर वर्षांतील 365 दिवस स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका आता प्रत्येकानेच घ्यायला हवी. तरच महिला दिन साजरा करण्याला काही अर्थ आहे. अत्याधुनिक जगातही स्त्रीला कस्पटासमान लेखण्याचे कमी प्रकार होत नाहीत. वास्तविक ती आता पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रांत उलेल्खनीय योगदान देत आहे. ती कितीही मोठ्या पदावर काम करत असू दे, तिला पुरूषी वृत्तीच्या वर्तनाला सामोरे जावे लागते. आजही ती फक्त उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिली जाते.

तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तसुभरही कमी झालेला नाही. कोणतेही वर्तमानपत्र उघडा किंवा बातम्यांचा चॅनेल लावा, महिला किंवा मुलींवरील अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येतातच. तिने आज शिक्षण घेतलेय. ती घराबाहेर पडली. ती नोकरी करू लागली. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. ती स्वावलंबी झाली. तरीही ती रस्त्याने चालली की असंख्य नजरा तिच्या शरीराचे लचके तोडत राहतात. तिने चमकदार कामगिरी केली, महिला दिन आला की, तिचे कौतुकच कौतुक होते, तिच्याविषयी आदराने बोलले जाते. परंतु, बोलणे वेगळे आणि कृती वेगळी याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत राहतो. मुलांवर संस्कार करण्यापासून घराची प्रगती व्हावी म्हणून ती हाडाची काडे करते. स्वतःपेक्षाही कुटुंबातील सर्वांसाठी ती राबते.

तिला मनाप्रमाणे जगता येत नाही. तिला आवडीचे पुस्तक वाचता येत नाही. तिला आवडीचे गाणे ऐकता येत नाही. गुणगुणताही येत नाही. एखादा आवडता चित्रपट लागला असेल तर तिला तो एकटीने जाऊन पाहता येत नाही. अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीत तडजोड करायची ती तिनेच. स्वतःच्या मनाप्रमाणे करण्याची मुभा तिला दिली जात नाही. एकीकडे स्त्री शक्ती म्हणून तिची पूजा करायची आणि दुसरीकडे तिची हेटाळणी करत तिला दडपून ठेवत आपल्याला हवे ते साध्य करून घ्यायचे, ही वृत्ती साऱ्या जगभर नांदते आहे.

यात बदल घडवायला हवा. त्याची सुरवात घरापासून व्हायला हवी. अपवाद वगळता बहुतेक सर्वच घरांमध्ये लहानपणापासूूनच एक संस्कार नकळत होत असतो. तो संस्कार रुजविण्यात स्त्रियांचाच अधिक पुढाकार असतो. घरात बहिणभाऊ असले तर भावालाच वेळोवेळी महत्त्व दिले जाते, हे प्रत्येक व्यक्तिच्या मनात लहानपणापासूनच बिंबत जाते. पुढे आपोआपच ‘ती’ त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची वाटत राहते. स्त्री- पुरूष समानता ही घरातून अशाच प्रकारे सुरू होते. मुळात ती जन्माला आली हाच तिचा दोष समजला जातो. अनेकदा जन्माआधीच तिला मारून टाकण्याचे प्रकार घडतात.

घरापासून सारे बदलले पाहिजे. तिला सन्मान देण्यासाठी प्रत्येकाची भूमिकाच महत्त्वाची असणार आहे. तिच्या भविष्यासाठी समाजाने दिशा दिली पाहिजेच. पण केवळ पुरूषानेच नव्हे तर स्त्रीने देखील आपली भूमिका घेत तिला महत्त्व द्यायला हवे. तिने आता ठाम व्हायला हवे. ती अबला नाही, याची जाणीव तिच्या मनात सतत असली पाहिजे. अशक्‍य ते करण्याची ताकद तिच्या अंगी असते. म्हणून स्त्री- पुरूष दोघांनीही या बदलाच्या प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे योगदान दिले पाहिजे. तिला सन्मान द्यायचा, असा आग्रह धरला पाहिजे. तिला मोकळा श्‍वास घेऊ द्या. तिला फुलू द्या.

तिला मनाप्रमाणे जगू द्या. ती म्हणजे फक्त एक खेळणे नाही, तीही एक ‘माणूस’ आहे, याची जाणीव मनामनांत जागी असेल तरच असा बदल घडविता येईल. तिला जपण्याची भूमिका घेऊन तिला तिच्या स्वतःच्या जगात मनस्वी जगू द्या. तरच खऱ्या अर्थाने तिला मानसन्मान मिळू शकेल. तिच्या जगात तिला जगता आले तरच महिला दिनाचे औचित्य साधले जाणार आहे. महिला दिन एक निमित्त, तिच्या जगण्याला दिशा देण्यासाठीचे. म्हणूनच तिला तिच्या स्वतःच्या जगातील जगण्याचा आनंद घेऊ द्या. विविध क्षेत्रांत गगनभरारी मारण्यासाठी तिच्या पंखात बळ भरण्याचे काम महिला दिनाच्या निमित्ताने झाले पाहिजे. यादिवशी एवढा एकच संकल्प करायला हवा.

श्रीकांत कात्रे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.