#महिला_दिन_विशेष : आदिवासी महिलांची पावले व्यवसायाकडे

चऱ्होली – औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिघी परिसरात आता आदिवासी महिलाही आपले उद्योजक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना दिसत आहेत. आपल्यातील कलागुणांना योग्य त्या प्रकारे वाव देऊन या महिला घरगुती व्यवसायाला प्राधान्य देत सक्षमपणे आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताना दिसून येत आहेत.

धानोरी, बोपखेल, भोसरी, दापोडी, पिपळे गुरव, नवी सांगवी भागातील आदिवासी महिला, बचत गटातील आदिवासी जमातीतील महिला आज पारंपरिक व्यवसायाकडे वळलेल्या पहायला मिळतात. पारंपरिक भात शेतीतून हात सडीचे तांदूळ, नाचणी पापड, करंवादाचे लोणचे, आदिवासी वनस्पतीपासून सुगंधी द्रव्ये, अगरबत्ती, मोहाच्या फुलाचे सिरप, जॅम, लाडू (डायबेटीस, बीपीसाठी हितकारक आदी वस्तू त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांच्या अस्सल ग्रामीण पदार्थांना ग्राहकांमधूनही मोठी पसंती मिळत आहे.

शहरातील जुन्नर, आंबेगाव, खेड या आदिवासी पाड्यांत भातशेती प्रामुख्याने केली जाते. त्याच भागातील शेतातून हात सडीचे तांदूळ अगदी लोंब्या गिरणीतून काढण्यापासून ते तांदूळ बाजारात मार्केटिंग करण्यापर्यंत सगळी कामे या महिलाच करतात. तांदूळ पॅकिंगपासून त्याची निर्यात शहरात करण्यापर्यंतची सगळी कामे त्या लिलया पार पाडत आहेत. विचारांची देवाणघेवाण देखील होत असल्याचे मत अध्यक्षा सीता किरवे यांनी सांगितले. श्‍वेता उगले म्हणाल्या, मेसेज, फेसबुक पेज, व्हॉट्‌सऍप, फ्लेक्‍सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जाते.

आदिवासी संघाचे सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे म्हणाले, सरकारकडून आदिवासी महिला व्यवसायाला मार्केटिंगचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. सध्या आदिवासी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून खाणावळ व कॅटरिंगचा लघुउद्योग सुरू केला आहे. या वेळी प्रीती किरवे, जनाबाई उगले यांनी आपले अनुभव सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.