#महिला_दिन_विशेष : महिलांवरील शॉर्ट फिल्म्‌सची युट्यूबवर पर्वणी

समस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न : महिलांशी संबंधित बारीक-बारीक विषयांचा समावेश

पुणे – “महिला दिन’ म्हटले की, महिलांशी संबंधित सहानुभूती, महिला सबलीकरण, महिलांचे शिक्षण या सगळ्याविषयातील लेख, भाषणे यांची “बम्बार्डिंग’ सुरू होते. परंतु सध्या “युट्यूब’वर महिलांविषयक “शॉर्ट फिल्म’ची पर्वणी सुरू आहे. त्यात महिला केंद्रीत विषयांच्या अगदी बारीक-बारीक विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

महिला दिनानिमित्त अनेकजण दरवर्षी अनेक फंडे काढत असते. परंतु यंदा “लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर चित्रपट, नाटक आणि एकूणच फिल्ममेकिंग, डॉक्‍युमेंटरी निर्मात्यांनी बेवसिरीज सारख्या विषयांमध्ये हात घालून ते “सक्‍सेस’ही केले आहेत. त्याचा उपयोग साहजिकच अशा “डें’मध्येही करून घेतला आहे.

“युट्यूब’ सर्च केल्यानंतर महिला केंद्रीत विषयांच्या अनेक शॉर्ट फिल्म्स तुम्हांला पाहायला मिळत आहेत. अगदी चार मिनिटांच्या शॉर्टफिल्म्स पासून ते 60 मिनिटांच्या फिल्म्स यामध्ये आहेत. याशिवाय महिला केंद्रीत जाहिरातीही प्रामुख्याने यामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

या शॉर्टफिल्म्स मध्ये केवळ ज्युनियर कलाकारांनीच सहभाग नोंदवला असे नाही, तर साक्षी तन्वर, दिव्या दत्ता, राधिका आपटे या आणि अन्य प्रसिद्ध सिनेकलाकारांनीही यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

त्यामध्ये लहान मुलींचे प्रश्‍न, वयात आलेल्या मुलींची मानसिकता, प्रेम, प्रेमभंग, ऋतुप्राप्ती, कार्यालयात “बॉस’ असलेल्या पत्नीविषयीची मानसिकता, गृहिणी, तिच्याविषयीच्या कुटुंबीयांच्या भावना, तिचे हक्क, विवाहबाह्य संबंध, महिलांना होणारी मारहाण, पती आजारी असताना घर आणि नोकरी अशी तिची होणारी ओढाताण, पैशांचा अभाव, वेश्‍याव्यवसाय यासंबंधीच्या विषयांचाही समावेश या शॉर्टफिल्म्समध्ये करण्यात आला आहे.

याशिवाय गर्भवतींना प्रमोशन देताना दिलेली डावी वागणूक, स्थळ पाहताना तिचा रंग, जाडी, कमी उंची यांना दिलेली दुय्यम वागणूक, नवऱ्यापेक्षा पगाराने, हुद्‌द्‌याने वरचढ असलेल्या महिलेबाबतची घरच्यांची वागणूक, नवऱ्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या महिलेकडे नातेवाईकांचा पाहण्याचा दृष्टीकोण, आपणच पिचलेलो आहोत ही महिलांची मानसिकता या सगळ्या गोष्टी या फिल्म्स मधून मांडण्यात आल्या आहेत. अर्थात या सगळ्या फिल्म्समधून “हॅपी एण्ड’ करत उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अशाप्रकारे महिला दिनाचे गिफ्ट देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.