#महिला_दिन_विशेष : ‘त्या’ करताहेत शेकडो करोना रुग्णांसह मृतदेहांचीही वाहतूक

रुग्णवाहिकेचे सारथ्यही तिच्या 'सामर्थ्यवान' हातांत!

पुणे – करोनाकाळात डॉक्‍टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांबरोबर समाजाला रुग्णवाहिका चालकांचे महत्त्वदेखील पटले. आतापर्यंत रिक्षापासून ते रेल्वेपर्यंत विविध प्रवासी वाहनांचे सारथ्य महिला समर्थपणे करत आहेत. मात्र, रुग्णवाहिकेच्या सारथ्याची धुरा चिंचवडच्या अनिता गोसावी अत्यंत जिद्दीने सांभाळत आहेत. करोनाकाळात भावाच्या मदतीला उभ्या राहिलेल्या गोसावी यांनी शेकडो रुग्णांची वाहतूक केली. यात करोनाबाधित रुग्णांसह मृतदेहांचादेखील समावेश आहे.

चिंचवड परिसरातील अनिता गोसावी यांचे शालेय शिक्षण पाचवीपर्यंतच झाले आहे. रुग्णवाहिका चालक भावाला करोनाची बाधा झाली. त्यामुळे भावाकडून गाडीसाठी चालकाचा शोध सुरू झाला. तेव्हा अनिता यांनी “मी गाडी चालवते’ असा निर्धार करत रुग्णवाहिकेचे सारथ्य करण्यास सुरुवात केली. ऑगस्टपासून त्यांनी रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले.

“मी स्कूलबसमध्ये सहायक म्हणून काम करत होते. बस रिकामी असताना चालकांना बस चालवण्याचे शिकवण्याची विनंती केली. त्या काकांनी बस चालवायला शिकवली. त्यानंतर “परफेक्‍ट ड्रायव्हिंग’ शिकण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतल्याचे गोसावी यांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये भावाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा तो चालक शोधत होता. त्यावेळी मीच गाडी घेऊन जाते, असे त्याला सांगितले. सुरुवातीला काही दिवस भीती वाटली. पहिल्या रुग्णाची वाहतूक करताना “जमेल का’ असा प्रश्‍न भेडसावत होता. एकटीच महिला चालक असल्याने वेगळेच वाटायचे. मी नवीन असताना सहकारी चालकांची मोलाची मदत झाली. आता मला सवय झाली आहे. मी वायसीएम रुग्णालयातून भोसरीपर्यंत करोना बाधितांच्या मृतदेहांची वाहतूक केली असल्याचे गोसावी म्हणाल्या.

मुलांना माझा अभिमान…
“सुरुवातीला आईच्या मनात थोडी भीती होती. मात्र, मला घरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलांना माझा अभिमान वाटतो. आजुबाजुच्या नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता. अनेक वाहनचालक रस्त्यावर थांबवून कौतूक करतात, प्रोत्साहन देतात’ असे अनिता म्हणाल्या. महिला कशात कमी नाहीत. त्यांनी ठरवले तर त्या काहीही करू शकतात. महिलांनी आपल्या पायावर उभे राहिले म्हणजे प्रश्‍न नाही. मी माझ्या सुनेच्या पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे, असे अनिता गोसावी यांनी “प्रभात’शी बोलताना नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.