#महिला_दिन_विशेष : काबाडकष्टातून ‘ती’ ठरली कुटुंबाचा आधार

महापालिकेच्या सुरक्षा कर्मचारी कल्पना आढाव यांच्या जिद्दीला सलाम

पिंपरी – पिंपरी येथील झोपडपट्टीत छोट्याशा जागेमध्ये जीवन कंठत तुटपुंज्या पगारामध्ये तिने संसाराचा गाडा ओढला. कोणाचाही आधार नसताना अत्यंत हालअपेष्टा सहन करत मुलगा अमित याला फिजिओथेरपिस्ट केले. महापालिका रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी कल्पना आढाव यांच्या विलक्षण जिद्दीची ही कहाणी.

पिंपरीतील नाणेकर चाळ येथील झोपडपट्टी परिसरात अमित आणि त्याची आई राहते. अमित 2 ते 3 महिन्याचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या आईने खंबीरपणे उभे राहत अमितच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. त्याचे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केले. गेल्या 14 वर्षांपासून कल्पना आढाव या महापालिकेच्या पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.

सुरूवातीला त्यांना अवघे तीन हजार रूपये दरमहा पगार मिळत होता. आता 14 हजार रुपयांपर्यंत पगार मिळत आहे. मुलगा अमित याला शिकवून मोठ्या हुद्‌द्‌यावर बसलेले पाहायचे त्यांचे स्वप्न होते. आर्थिक ओढाताण असल्याने ते शक्‍य होण्यासारखे नव्हते. मात्र, त्यांनी शर्थीने प्रयत्न केले. रुग्णालयातील कामाबरोबरच अनेकांकडे त्यांनी धुणी-भांड्याचे कामही केले.

बऱ्याच वर्षांचा खडतर प्रवास पार करत त्यांनी मुलाला जिद्दीने फिजिओथेरपिस्ट केले. अमितने निगडी-प्राधिकरण येथील फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमधून फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण केले.

अमितला आता उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथील लीड्‌स बेकेट विद्यापीठात संधी मिळाली आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मदतीच्या पंखांची गरज आहे. अमित हा स्पोर्टस एक्‍सरसाईज मेडिसिनमधील दीड वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण करणार आहे. त्यासाठी त्याला शैक्षणिक शुल्क, राहण्याचा व जेवणाचा असा एकूण 21 लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. एवढी मोठी रक्‍कम उभारणे शक्‍य नसल्याने दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी यासाठी मदत करावी, असे आवाहन कल्पना आढाव यांनी केले आहे.

महापालिकेने करावी सर्वतोपरी मदत
अमित आढाव यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारून त्याला सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत महापौर उषा ढोरे व आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे. संस्थापक-अध्यक्ष धम्मराज साळवे, महासचिव संतोष शिंदे, पिंपरी चिंचवड संघटक अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.

‘मुलगा अमित याचे फिजिओथेरपीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी त्याला संधी मिळाली आहे. त्यासाठी बॅंकेकडून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बॅंकेकडून 7.5 लाख रुपयांपर्यंतचेच शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्‍त खर्चासाठी मदतीची गरज आहे.’
– कल्पना आढाव, सुरक्षारक्षक.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.