#महिला_दिन_विशेष :करोनाला थोपविण्यासाठी रणरागिणींचा लढा सुरुच

वाईकर नगरसेविकांची धडपड; जनतेच्या सुरक्षिततेसाठी गो करोना'चा नारा

देशात वर्षभरापूर्वी प्रवेश केलेल्या करोनाने अवघ्या काही कालावधीतच देशभरात थैमान घातले. करोनाला रोखण्यासाठी राबविण्यात आलेली लॉकडाऊनची मात्रा गुणकारी ठरत असतानाच लॉकडाऊन शिथिल केल्याने आज पुन्हा देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. विशेषत: महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई व पुणे या महानगरांसह अनेक छोट्यामोठ्या शहरांमध्ये करोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यातही करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. माण, खटाव, फलटण यासारखे तालुके करोनाचे हॉटस्पाट ठरत असून इतर तालुक्‍यांमध्येही बाधित रुग्ण सापडत आहेत. मात्र, असे असतानाही वाई शहरातील करोनाला रोखण्यासाठी पालिका प्रशासन सुरुवातीपासून योग्य त्या आणि ठोस उपाययोजना राबविण्यात आघाडीवर आहे. करोनाच्या या लढाईत वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी प्रशासनाचे अधिकारी व नगरसेविकांना बरोबर घेत लढाई सुरु केली आहे. या सर्व करोना योद्‌ध्यांची सरशी झाली.

राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व शहरात करोना विषाणूचा शिरकाव झाला होता. बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत असताना लॉकडाऊन शिथिल केल्याने सद्यपरिस्थितीत पुन्हा बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक ठिकाणी करोनाला थोपवण्यासाठी उपाययोजना करताना प्रशासनाची दमछाक झाली.

जिल्ह्याच्या बहुतांश भागात करोनाचा पुन्हा विस्फोट झाला आहे. अन्य तालुक्‍यांमध्ये एकाच दिवसात करोनाचे दोन अंकी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या भागात करोनाची साखळी तुटता तुटत नसल्याची परिस्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मात्र, करोनाच्या अशा गंभीर परिस्थितीतही वाईच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी प्रशासन व सर्व नगरसेवकांना बरोबर घेत गो करोना’चा नारा दिला. त्यांनी सुरुवातीपासूनच नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शहरातील प्रत्येक प्रभागात प्रभावीपणे आवश्‍यक त्या सर्व कडक उपाययोजना राबविल्या. त्या आजअखेर तशाच सुरु असल्याचे पाहवयास मिळत आहे. प्रत्येक प्रभागात निर्जंतुकीकरण, नाले व ओढ्यांची स्वच्छता, नागरिकांमध्ये विविध प्रकारे जनजागृती करुन करोनाला अटकाव घालण्याचा प्रयत्न सुरु होता व आहे.

वाई शहरातील वर्दळीचे दोन परिसर वगळता करोनाला पालिका प्रशासनाने रोखून धरले आहे. त्यामुळे वाईकर अजूनहीकरोनापासून सुरक्षित आहेत. वाई पालिका प्रशासन व नगरसेवकांनी हातात हात घालून संयुक्तरित्या काम केल्याने हे यश मिळाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व नगरसेवक विशेषत: रणरागिणी समजल्या जाणाऱ्या महिला नगरसेविका याच खऱ्या करोना योद्धे ठरल्या आहेत.

नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, शहरातील 10 प्रभागांमधील 12 रणरागिनी नगरसेविका, आरोग्य बांधकाम व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह संपूर्ण नगरपालिका प्रशासनाची टीम स्थानिक नागरिकांच्या मदतीने अहोरात्र करोनाला रोखून धरण्यासाठी सुरुवातीपासून दोन हात करत होती आणि आजही करत आहे. प्रत्येक प्रभागनिहाय इमारत व गल्लीच्या कानाकोपऱ्यात सोडियम हायपोक्‍लोराईटची वारंवार फवारणी करुन परिसर निर्जंतुकीकरण करण्यावर पालिकेने दिलेला भर आजही कायम आहे.

अगदी सुरुवातीच्या काळात शहरातील घराघरांत जाऊन मुंबई- पुणे व अन्य ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींची दैनंदिन माहिती घेऊन अशा सर्व लोकांना तात्काळ होम क्वारंटाइन केले जात होते. यासाठी पालिकेकडून प्रत्येक भागासाठी पथके नेमण्यात आली होती. शहरातील गरजू व्यक्तींना कर्मचारी वर्गामार्फत जीवनावश्‍यक वस्तूंचा कोरडा शिधा वाटपाचे नियोजन नेटके नियोजन पालिकेने केले होते. विशेष म्हणजे व्यक्ती व संस्थांकडून जीवनावश्‍यक वस्तू वाटप केल्या जात होत्या. परंतु,, वाई पालिकेने गोरगरिबांचा विचार करुन स्वत:च कोरडा शिधा वाटपास सुरुवात केली. यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय टाळणे शक्‍य झाले. लोकांना जीवनावश्‍यक साहित्य वाटप करणारी वाई ही पहिलीच नगरपालिका ठरली आहे. या उपक्रमाचे राज्यभर कौतुकही झाले.

करोनाच्या लढाईत वाईकरांची मोलाची साथ

सुरुवातीच्या काळात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पालिकेने नागरिकांच्या हितासाठी कठोर निर्णय घेतले. लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे नागरिक व व्यावसायिकांना चांगली शिस्त लागली. आजही वाई पालिका प्रशासनाकडून करोनाच्या पोर्शभूमीवर घालून दिलेले नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळेच करोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश येत आहे. या सर्व उपाययोजना करत असताना भावनिकतेची किनार असलेल्या मृतदेहांचा विषयही पालिका प्रशासन व नगरसेविकांनी आजवर लिलया हाताळला आहे.

करोनाने मृत्यू झालेल्यांवर वाई शहरातील रविवार पेठेत स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पडत आहेत. जे कर्मचारी हे कार्य करत आहेत, त्या कर्मचार्ऱ्यांनाही पीपीई कीट, मास्क, हॅण्डग्लोव्हज अशा सुरक्षिततेच्या वस्तू पुरवण्यात येत आहेत. अशा संकट काळातही प्रशासन व नगरसेविका कर्तव्यांची भावना जपण्याचा प्रयत्न करत आहेत. करोनाच्या लढाईत वाईकर लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोलाची साथ देत आहेत. त्यामुळेच हे सर्व पदाधिकारी व जनसेवक आणि विशेष म्हणजे रणरागिणी समजल्या जाणाऱ्या नगरसेविका अन् प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचारी या वाईकरांच्या दृष्टीने करोना योद्धे आहेत. त्यांना सलाम.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.