#महिला_दिन_विशेष : पोलीस दलातील रणरागिणी… : जयश्री पाटील सहाय्यक पोलिस निरिक्षक

अचानकपणे ओढवणारी अस्मानी संकटे आणि त्याचा यशस्वी मुकाबला करण्याची दैवी ताकत हा कोल्हापूरच्या मातीचा गुणधर्मच. या मातीत जन्मलेल्या महिला पोलीस अधिकारी जयश्री पाटील यांचे काम उल्लेखनीय आहे. गतवर्षी करोना महामारीच्या काळात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या तळबीड पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या वनवासमाची गावावर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रीत झाले. मात्र, या भयावह परिस्थितीत दिवस-रात्र पहारा देणारी आणि विभागातील कायदा सुव्यवस्था आबाधीत ठेवणाऱ्या तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांना रणरागिणी म्हंटलेतर वावगे ठरणार नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. नाशिक येथील खडतर ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांना पहिले पोस्टिंग कोकणात सावंतवाडीत मिळाले. येथे अनेक छोट्या-मोठ्या कारवाईच्या माध्यमातून त्यांच्या अंगीभूत गुणांची चूनुक दाखवली. सावंतवाडी नंतर काही काळ रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावली. कोकणातील यशस्वी सेवेनंतर त्या प्रमोशनवर सांगली जिल्ह्यातील आष्टा या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या. खून, खुनाचा प्रयत्न व महिलांबाबतच्या गुन्ह्यात त्या अतिशय सजग राहिल्या आहेत.

सध्या त्या सेवेत असलेल्या तळबीड पोलीस ठाण्याच्याअंतर्गत येणारा तासवडे टोलनाका हा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. राज्यभरातील अनेक गुन्हेगारांचा तपास करण्याकरता परजिल्ह्यातील पोलीसही नेहमी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने अनेक गुन्हेगारांचा पर्दाफाश करत आहेत. याबाबतही त्यांनी नेहमीच सहकार्याची भावना ठेवल्याची दिसते. तासवडे औद्योगिक वसाहतीतील अनेक प्रश्‍न सोडवले आहेत. गतवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा येथे आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले होते.

राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे हजारो ट्रक रस्त्यावरच थांबले होते. एक सुरक्षित ठिकाण म्हणून तासवडे टोल नाक्‍याच्या परिसरात थांबवलेल्या ट्रक चालकांची त्यांनी यथोचित काळजी घेतली. त्यांनी केलेल्या सेवेची दखल घेऊन कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. करोना लढ्यात आजही त्या अहोरात्र सक्रिय आहेत. वनवासमाचीतील करोना काळात त्यांच्यासह टीमने थोडीशीही उसंत घेतली नाही. तहानभूक हरपून त्यांची टीम कार्यरत होती. आपल्या कर्तव्याबरोबर आपल्या कुटुंबाकडेही त्यांनी तेवढेच लक्ष दिले आहे. या दुहेरी जबाबदारीत जयश्री पाटील कोठेही कमी पडलेल्या नाहीत, अशा रणरागिणीला महिला दिनाच्या शुभेच्छा…. !

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.