7 पंचायत समित्यांत येणार महिलाराज

जिल्ह्यातील 13 सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

पुणे – जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभापती पदाची पुढील दोन वर्षांसाठींची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही सोडत काढण्यात आली असून, 7 पंचायत समितीमध्ये महिला सभापती आरक्षण पडले आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेबरोबरच आता या सात पंचायत समितीमध्ये “महिला राज’ असणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण यापूर्वीच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, पंचायत समित्यांच्या सभापती पदाची पहिल्या टप्यातील मुदत संपत आल्याने नव्याने सभापतींची निवड करण्यासाठी शुक्रवारी (दि. 13) जिल्हा परिषदेच्या यंशवतराव चव्हाण सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले, तहसीलदार विकास भालेराव, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, शरद लेंडे, प्रमोद काकडे, आशा बुचके, संयज भोसले, रोहित कोकरे उपस्थित होते. सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत झाली.

या 13 पंचायत समित्यांपैकी आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, मुळशी, शिरूर पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर जुन्नर, खेड, पुरंदर या पंचायत समित्या शिवसेनेकडे आहेत. इंदापूर आणि वेल्हा या कॉंग्रेसकडे, तर मावळ ही एकमेव पंचायत समिती भाजपकडे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.