महिला मतदारांनी मानले कांबळे यांचे आभार

कॅन्टोन्मेंट – महिला बचत गटाच्या माध्यमातून स्थायी समिती अध्यक्ष असलेले सुनील कांबळे यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हातभार लावला आहे. त्यामुळे वस्ती पातळीवरील महिलांनाही नवी उमेद मिळाली असल्याच्या भावना केदारीनगर परिसरातील महिलांनी व्यक्‍त केल्या.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी केदारीनगर, वानवडी भागांत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी या भागातील महिलांनी कांबळे यांच्या माध्यमातून झालेल्या मदतीची माहिती देत त्यांच्या प्रचार फेरीतही सहभाग घेतला. या महिलांसह कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित, कोमल शेंडकर, संतोष इंदूरकर, नगरसेवक कालिंदी पुंडे, धनराज घोगरे, उमेश गायकवाड, दिनेश होले यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, या भागातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून हाताला काम देण्याची संधी मला मिळाली. याशिवाय, केंद्र शासनाच्या उज्वला योजना, तसेच इतर योजनांच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत करता आली. त्यामुळे या महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले असून त्याचा आपल्याला विशेष आनंद आहे.

याशिवाय, भविष्यातही महिला स्वावलंबन, आरोग्य, महिला शिक्षण यासाठी आपला पुढाकार राहणार असल्याचे आश्‍वासन कांबळे यांनी यावेळी महिला मतदारांशी बोलताना दिले. यावेळी कांबळे यांना औक्षण करून त्यांना विजयासाठी या महिलांनी शुभेच्छा दिल्या.

मतदारांशी संवाद
कांबळे यांनी शिंदे छत्री आणि ताडीवाला रस्ता परिसरातही पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. यावेळी गेल्या पाच वर्षांत भाजपच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून या विधानसभेलाही मतदार भाजपच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहतील, असा विश्‍वास यावेळी कांबळे यांनी मतदारांशी बोलताना व्यक्‍त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here