गुंतवणुकीचे निर्णय घेण्यात महिला पिछाडीवर

केवळ 33 टक्‍केच महिला गुंतवणुकीचे निर्णय घेतात

नवी दिल्ली – शिक्षणाच्या विविध विभागात गेल्या काही दशकापासून मुलींचे पास होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर नोकऱ्यांच्या विविध क्षेत्रातही महिलांचे प्रमाण वाढत आहे. बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातही महिलांचा वावर वाढत असला तरी एकूणच गुंतवणुकीच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिला आणखीही मागेच असल्याचे एका अभ्यास अहवालात आढळून आले आहे.

डीएसपी या संस्थेने जारी केलेल्या या अहवालानुसार भारतातील फक्‍त 33 टक्‍के महिला काही प्रमाणात गुंतवणुकीचे निर्णय स्वतंत्रपणे घेतात. मात्र पुरुषांच्या बाबतीत हेच प्रमाण 64 टक्‍क्‍यांवर आहे. त्यामुळे महिलांनी या क्षेत्रातही पुढाकार घ्यावा यासाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्याचे डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स या संस्थेचे अध्यक्ष कल्पेश पारेख यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विविध क्षेत्रातील महिलांचा वावर वाढत असूनही गुंतवणुकीच्या बाबतीत महिला आणखीही मागे आहेत. वित्तीय क्षेत्र, बॅंकिंग क्षेत्र तसेच मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातही महिला पुढे येत आहेत. त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीचे निर्णय घेण्यातही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्यास अहवालानुसार ज्या महिला गुंतवणुकीचे निर्णय घेतात त्या बऱ्याच प्रमाणात स्वतःहून घेत नाही तर कौटुंबिक अडचण असल्यास किंवा पालक किंवा पतीची अनुपस्थिती असल्यास त्या असे निर्णय घेतात. मात्र, यातील 30 टक्‍के महिलांनी असे सांगितले की त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना गुंतवणुकीचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यास प्रेरणा दिली जाते.

महिला आणि पुरुष गुंतवणुकीचे निर्णय घेताना मुलांचे शिक्षण, घर, मुलांची लग्न, कर्जाचा भार कमी करणे इत्यादी विषयाचा विचार करतात. या अहवालानुसार कार किंवा घर घेताना महिलांच्या पेक्षा पुरुषांच्या निर्णयाला जास्त महत्त्व दिले जाते. तर सोने, दागिने आणि दैनंदिन वापराच्या वस्तू विकत घेताना महिलांच्या निर्णयाला महत्त्व दिले जाते. या अहवालानुसार फक्त 12 टक्के महिलांनी सांगितले की, त्या शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा निर्णय स्वतंत्रपणे घेतात. तर 31 टक्के पुरुषांनी सांगितले की, ते शेअरबाजार, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा निर्णय स्वतंत्रपणे घेतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.