वाराणसी – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पाचव्या टप्प्यापूर्वी वाराणसीमधील शिक्षकांनी मतदानाबद्दलच्या जनजागृतीसाठी आज “पिंक रॅली’ काढली. संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी झालेल्या शिक्षिकांनी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या, तर युवतींनी गुलाबी रंगाचे ड्रेस घातले होते. त्यांनी स्कूटीवरून काढलेल्या या रॅलीमध्ये महिलांना मतदान आवर्जून करण्याचे आवाहन करण्यात आले.
महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. मतदानाचा हक्क महिलांनी आवर्जून वापरावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वाराणसीमधील पोलीस लाइनमधून या रॅलीला प्रारंभ झाला आणि 10 किलोमीटर दूरपर्यंत ही रॅली चालली.
महिलांमध्ये मतदानाचे प्रमाण तुलनेने कमी असते असे बघायला मिळाले आहे. त्यामुळे महिलांना मतदानाबद्दल उद्युक्त करण्यासाठी हा प्रयत्न आहे, असे या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिक्षिकांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. उत्तर प्रदेशातील मतदान 7 टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यातील चार टप्प्यांतील मतदान झाले आहे. उर्वरित मतदान 27 फेब्रुवारी, 3 आणि 7 मार्च रोजी होणार आहे.