त्रासापासून मुक्तीसाठी महिला सरपंचांचे मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

पाचगणी  -जावळी तालुक्‍यातील शिंदेवाडी गावाने सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या एकीतून दिल्लीपर्यंत धडक मारून गावचे नाव उज्वल केले असताना काही गावटग्यांच्या करामतींमुळे महिला सरपंचांना चक्क पाटीलकी त्रासापासून मुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालावे लागत आहे. महिला सरपंचांना या सराईत गावगुंडाच्या त्रासापासून व कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या लोकांपासून वाचवण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडे त्यांनी लेखी गाऱ्हाणे मांडले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की शिंदेवाडी येथील युवा सरपंच सौ. धनश्री शिंदे यांनी गावाला संघटित करून ग्रामस्थांच्या सहकार्यातून तीन वर्षाच्या कालखंडात विविध विकास कामांचा डोंगर उभा केला. तालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीचा गौरव झाला. स्वच्छ शौचालय स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला. सातारा जिल्ह्याला मिळालेला पुरस्कार जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील टीममध्ये दिल्लीला जाऊन स्वीकारला. त्यामुळे शिंदेवाडीचे नाव देशभर गाजले.
महाराष्ट्रातील अनेक गावांचे पदाधिकारी व ग्रामस्थ सातत्याने या कामाची पाहणी करायला येत आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने प्रथम क्रमांक पटकावला.

आता स्मार्ट ग्राम स्पर्धेत गावाने सहभाग घेऊन तालुक्‍यात प्रथम येण्याची औपचारिकता बाकी आहे. परंतु, करोना काळात या महिला सरपंचांना व सदस्यांना गावाच्या सुरक्षिततेसाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले. हे निर्णय सर्वांच्याच फायद्याचे होते. पण याच गोष्टीचा राग मनात धरून आणि या नियमांचे भांडवल करून समाजाने पाटीलकी म्हणजे जणू जहागिरीच बहाल केली आहे या आविर्भावात वावरणाऱ्या काही प्रवृतींकडून महिला सरपंचांना टार्गेट केले जात आहे.

सर्वांनी मिळून त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल म्हणून त्यांचेकडे तंटामुक्ती अध्यक्षपदाची धुरा दिली. गावातील सर्व निर्णय या तथाकथित पुढाऱ्यांना विचारूनच सरपंच व त्यांचे सहकारी घेत होते. मग कुठे तरी माशी शिंकली. याचा विचार केला तर या जहागीरदारांच्याच घरात मुंबईवरून आलेल्या युवकाला करोनाची लक्षणे जाणवत असतानाही कमिटीच्या निर्णयांना न जुमानता स्वतःच्या इभ्रतीसाठी व दबावाने घरात बंदिस्त केले. उपचाराअभावी तो जिवानिशी गेल्यावर या चुकीचे खापर गावावर फोडण्यास या जबाबदार व्यक्तीने सुरुवात केली. चिडून गावातील अतृप्त आत्म्यांना एकत्र करून सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांच्याविरूद्ध भडकवण्याचा नवा धंदा सुरू केला. सरपंचांना अपमानास्पद मानहानीकारक वागणूक देण्याचे उद्योग सुरू केले. त्यामुळे सरपंच अक्षरशः वैतागल्या आहेत.

गावटग्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
काही मुंबईकर गावावर अंकुश ठेवण्यासाठी गावातील अपप्रवृत्तींना हाताशी धरून गावाला वेठीस धरण्याचे काम करीत असून गावाला विस्कळीत करण्याचा जणू विडाच उचलला असल्याचे दिसत आहे. काही लोक धाक दाखवून दमदाटी करून सरपंच व त्यांच्या टीमला त्रास देण्याचे काम करीत आहेत. महिला सरपंचांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून याच बुजुर्ग व जाणत्या लोकांच्या विचारानेच सर्व निर्णय घेतले असताना स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःची लफ्तरे झाकण्यासाठी या गावटग्यांकडून सरपंचांना टार्गेट केले जात आहे. या सर्व त्रासाला सरपंच व त्यांचे कुटुंबीय कंटाळले आहेत. या गावटग्यांचा बंदोबस्त करावा आणि आम्ही त्यांना हवा असणारा हिशोब देण्यास केव्हाही तयार असून पत्रकबाजीद्वारे गावाची बदनामी होऊ नये, या गाव टग्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी सरपंचांनी अर्जाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.