शक्‍ती मल्टिपर्पजकडून महिलांना लाखोंचा गंडा

तळमावले येथील शाखा बंद; पन्नासहून अधिक महिलांचे आ. देसाई यांच्याकडे गाऱ्हाणे

सणबूर – शक्ती मल्टिपर्पज सोसायटी लि. पुणे या संस्थेने तळमावले ता. पाटण परिसरातील पन्नासहून अधिक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. तळमावले येथील शाखा बंद करून व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांनीही रातोरात धूम ठोकल्याने दाद कुणाकडे मागायची? या भीतीने महिला हवालदिल झाल्या असून त्यांनी आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेऊन पैसे मिळवून देण्याबाबत गाऱ्हाणे मांडले आहे. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले आहे.

निवेदनातील माहिती अशी, शक्ती मल्टिपर्पज सोसायटी लि. पूणे शाखा तळमावले या संस्थेने गरीब महिलांना घरी जावून अफलातून व्याजदराचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत येथील महिलांनी मोलमजूरीतून मिळणारा पैसा मासिक आणी फिक्‍स ठेव योजनेत गुंतवला. सुरुवातीला संस्थेने उत्तमरित्या पैशांची देवाणघेवाण करुन महिलांचा विश्वास संपादन केला. नंतर एजंटद्वारे पैसे गोळा करण्यास सुरूवात करण्यात आली.

काही दिवसानंतर पूणे विभागातील अनेक शाखेत संस्था डबघाईला आल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू झाली. तर काही दिवसात बहुतांश शाखा बंद पडल्या. तरीदेखील येथील महिलांना अंधारात ठेवून तळमावले शाखेतील कर्मचाऱ्यांनी पैसे गोळा करणे सुरुच ठेवले. संस्था दिवाळखोरीत निघाल्याची चर्चा तळमावले परिसरात काही दिवसांनी सुरु झाल्यावर एकच खळबळ उडाली. तळमावले येथील शाखेभोवती ठेवीदारांचा गराडा पडला. शाखाप्रमुख पांडूरंग डुबल यांनी माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे पैसे बुडणार नाहीत, असे सांगून महिलांची बरेच दिवस दिशाभूल केली. तीन महिन्यापूर्वी संस्थेच्या तळमावले शाखेस टाळे ठोकून त्यांनी पोबारा केला.

एक वेळ पोटाला चिमटा घेऊन येथील महिलांनी साठवलेली जमापुंजी गंगाजळी जावू नये यासाठी अनेक ठिकाणी मदतीसाठी हाथ पसरले. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली. शेवटी आ. शंभूराज देसाई यांची भेट घेऊन त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. आ. देसाई यांनी तात्काळ सहकारमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना दूरध्वनीवरून शक्ती सोसायटीची चौकशी करण्याविषयी विनंती केली. यावर ना. पाटील यांनी आयुक्तांना आदेश देवून पैसे परत मिळवून देतो, असा शब्द आ. देसाई यांना दिल्याने महिलांमध्ये आशा जागृत झाल्या आहेत.

अनेक ठिकाणी मदत मागून सर्वांनी हात वर केल्यावर शेवटी आम्ही सर्व महिला कारखान्यावर जाऊन आ. शंभूराज देसाई यांची भेट घेऊन पैसे काढून देण्यासाठी विनंती केली. यावर आ. देसाई यांची जनतेच्या कामाविषयीची तळमळ आणि काम करण्याची पद्धत बघून लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आठवण झाली.

सावित्री कदम, ग्रामपंचायत सदस्य, भोसगाव

Leave A Reply

Your email address will not be published.