मुंबई – राज्यातील महिला पोलिसांचा सेवा कालावधी 12 तासांऐवजी आठ तास करण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शनिवारी दिले. प्रायोगिक पातळीवर हा निर्णय घेण्यात येत त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
पुरूष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना 12 तासांची शिफ्ट असते. पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्युटी ही पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे.
महिला अधिकाऱ्यांना काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला समतोल साधता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी हा निर्णय नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये लागू करण्यात आला होता.
आपत्कालीन स्थितीत किंवा सणासुदीच्या काळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकतात. मात्र, ते केवळ संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्तांच्या परवानगीने करता येऊ शकते, असे त्यात म्हटले आहे.