मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये महिलांचा मोर्चा

संगमनेर – मणिपुरमध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर शहरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी काळ्या साड्या व काळे ड्रेस परिधान करून या घटनेचा निषेध केला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून यामुळे जगात देशाची नाचक्की झाल्याचा तीव्र संताप तांबे यांनी व्यक्त केला.
जय हिंद महिला मंच व संगमनेरमधील विविध महिला संघटनांच्या वतीने संगमनेर बसस्थानक ते नवीन नगर रोड-मेन रोड- चावडी मार्गे शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनांच्या हजारो महिला काळ्या साड्या व काळे कपडे घालून सहभागी झाल्या होत्या.
यावेळी विविध महिला मंडळे व महिला संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी ऍड.रंजना गवांदे, ऍड. ज्योती मालपाणी, ऍड. निशाताई शिवूरकर, प्रा. हिरालाल पगडाल, डॉ मैथिली तांबे यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या निषेध मोर्चा नंतर अहिल्या सत्यजित तांबे हिच्या हस्ते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.
मणिपूर घटनेचा आ. थोरातंकडून निषेध
मणिपूरमधील घटना ही अत्यंत वेदनादायी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत असून दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
महिलांच्या रक्षणार्थ राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविणार
देशाच्या राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजातील महिला असून काही राज्यांमध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार ही अमानवीय आहे. महिला सुरक्षिततेचा देशभर महत्त्वाचा मुद्दा झाला असून याबाबत केंद्र व राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याबाबत राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मु यांना संगमनेर मधून हजारो महिलांच्या वतीने पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत.





