कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत तीन वाहनांची शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एकमेकांना धडक झली. या विचित्र अपघातात शिल्पा मनोहर भगत (वय 62, रा. लालबाग, मुंबई) या ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
हर्षद मनोहर भगत (वय 40), मनोहर आत्माराम भगत (वय 60), मिताली अनंत सपकाळ (वय 32, तिघे रा. लालबाग, मुंबई), कारचालक सतीश साहेबराव भोईटे (वय 45), पिकअप चालक महेश आनंदा गायकवाड (वय 28, रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना ँखासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लालबाग (मुंबई) येथे राहणारे भगत कुटुंबीय ब्रिझा कारने (एमएच-01-सीटी 3939) कोल्हापूरकडे जात होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मलकापूरच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक तोडून पुणे बाजूकडे जात असलेल्या पिकअप टेम्पाला (एमएच-45-टी 4096) धडकली. त्यावेळी या दोन वाहनांची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात मिनी टेम्पो (एमएच-09-सीयूग 1953) उलटला.
या विचित्र अपघातात कारमधील शिल्पा भगत या जागीच ठार झाल्या, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी क्रेन बोलावून तिन्ही वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.