महिला आणि पुरुषांची संख्या “फिफ्टी-फिफ्टी’
नव्या आठ सदस्यांमध्ये सात महिला आणि एका पुरुषाची नियुक्ती
पुणे – महापालिकेतील स्थायी समितीमध्ये महिलाराज आले असून, आता समितीमध्ये महिला आणि पुरुष सदस्यांची संख्या “फिफ्टी-फिफ्टी’ झाली आहे. सोमवारी झालेल्या मुख्यसभेत सर्व पक्षाच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नव्या आठ सदस्यांमध्ये सात महिला सदस्यांची आणि एका पुरुष सदस्याची नियुक्ती करण्यात आली.
सभागृहातील सदस्य संख्येनुसार प्रत्येक पक्षाला स्थायी समितीत सदस्यत्त्व दिले जाते. सोळा सदस्य असलेल्या या समितीत प्रत्येकवर्षी आठ सदस्य निवृत्त होतात, त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार भाजपच्या 4, राष्ट्रवादीच्या 2 तर, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 1 नगरसेवकांची नियुक्ती केली गेली. भाजपकडून वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, सुनंदा गलांडे, उज्ज्वला जंगले, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अमृता बाबर आणि नंदा लोणकर, कॉंग्रेसकडून लता राजगुरू आणि शिवसेनेकडून बाळा ओसवाल यांना संधी देण्यात आली.
दरम्यान, मुख्य सभेत सर्व पक्षाच्या नेत्यांनी सुचवलेल्या नावांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली. यामध्ये भाजपचे दिलीप वेडेपाटील, रंजना टिळेकर, योगेश मुळीक, उमेश गायकवाड, कॉंग्रेसच्या वैशाली मराठे, राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने, स्मिता कोंढरे या 7 सदस्यांचा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता. तर, शिवसेनेतर्फे आपल्या सदस्याला 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. शिवसेनेचे विशाल धनवडे यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने ओसवाल यांना संधी देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
भाजपच्या वर्षा तापकीर या महापौरपदाच्या रेसमध्ये होत्या. लोणकर यांनी विरोधी पक्षनेत्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यांना ती पदे मिळाली नाहीत. त्यामुळे पक्षाने त्यांना स्थायी समिती सदस्यत्व देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.