महिला हॉकीत भारताची आगेकूच; ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत प्रवेश

हिरोशिमा – भारतीय महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या एफआयएच चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आणि ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत प्रवेश केला. येथील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांनी चिली संघाचा 4-2 असा पराभव केला.

चुरशीने झालेल्या लढतीत भारतीय संघाने चिली संघास 1-1 असे बरोबरीत रोखले होते. भारताकडून गुरजित कौर हिने दोन गोल केले तर नवनीत कौर व राणी रामपाल यांनी प्रत्येकी एक गोल केला. चिलीकडून कॅरोलीन गार्सिया व मॅन्युएला उरूझा यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत दोन्ही संघांनी जिद्दीने खेळ केला. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला कॅरोलीन हिने चिली संघाचे खाते उघडले. मात्र, त्यांचा हा आघाडीचा आनंद फार वेळ टिकला नाही. त्यानंतर चारच मिनिटांनी भारताला गोल करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत गुरजित हिने गोल करीत 1-1 अशी बरोबरी साधली. याच बरोबरीत पूर्वार्ध संपल्यानंतर उत्तरार्धात प्रारंभापासून भारतीय खेळाडूंनी जोरदार चाली केल्या. 31 व्या मिनिटाला नवनीत हिने सुरेख चाल करीत भारतास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

पाठोपाठ 37 व्या मिनिटाला गुरजित हिने पुन्हा एक अप्रतिम गोल केला. त्यामुळे भारतास 3-2 अशी आघाडी मिळाली. मॅन्युएला हिने 43 व्या मिनिटाला चिली संघाचा दुसरा गोल केला. या गोलमुळे सामन्यातील चुरस वाढली. 57 व्या मिनिटाला राणी हिने भारताचा चौथा गोल करीत संघाला 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी भक्कम बचाव करीत चिली संघाच्या अनेक चाली परतविल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.