आर्थिक कारणावरुन महिलेस पिस्तुलाचा धाक; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

पुणे- आर्थिक फसवणुकीचा गुन्हा मागे घेण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारात घेतलेले 32 लाख रुपये परत मागू नये, यासाठी एका इस्टेट एजंट महिलेस प्रकाश फाले, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह दहा जणांनी पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जगताप, बऱ्हाटे यांच्याविरुद्ध दाखल झालेला आर्थिक फसवणुकीचा हा पाचवा गुन्हा आहे.

प्रकाश फाले, सविता फाले, यश फाले, अण्णा दळवी (नायकवडी), बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, स्वयंघोषीत पत्रकार देवेंद्र जैन, जयेश जगताप, परवेझ जमादार व मयूर हरगुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची कोथरूड येथे जमीन-खरेदी विक्रीची एजन्सी आहे. 2012 मध्ये प्रकाश फाले याची फिर्यादी यांच्याशी एका जागेच्या व्यवहारावरून ओळख झाली. त्यानंतर त्याने कोथरूड येथील जागेत पैसे गुंतवा, तुम्हाला दुप्पट पैसे मिळवून देतो असे आमिष दाखविले. त्यावर विश्‍वास ठेवून फिर्यादी यांनी फाले यास 32 लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी दिले. त्यानंतर जमिनीचा व्यवहार न झाल्याने फिर्यादीने त्याच्याकडे पैसे मागण्यास सुरवात केली. मात्र फाले याने पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात 2015 मध्ये फिर्याद दिली होती. दरम्यान, या प्रकरणात दळवी-नायकवडी याने पैसे परत मिळवून देण्याचा बहाणा करून फिर्यादीला त्याच्या कार्यालयात नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादी पुन्हा पैसे न मागण्यास सांगितले. दरम्यान, शैलेश जगतापनेही पैसे मिळवून देतो असे सांगून त्यांना त्याच्या कार्यालयात बोलावले. त्यावेळी तेथे शैलेश व जयेश जगताप, बऱ्हाटे, फाले उपस्थित होते. फिर्यादीची फाले याच्यासमवेत भांडणे झाली. त्यावेळी बऱ्हाटे याने फालेकडे मोबाईल देऊन त्याच्याविषयी माहिती देण्यास सांगितले.

तेव्हा फाले याने बऱ्हाटे याच्या बातम्या, व्हिडिओ क्‍लिप दाखवून आमदाराला कसे पाया पडायला लावले, हे सांगत बऱ्हाटे काहीही करू शकतो, अशी धमकी दिली. त्यावेळी शैलेश जगतापनेही धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याच पद्धतीने संबंधित आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत देण्याचा बहाणा करून धमकी दिली. यातील जैन याने खोटी बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिली, अण्णा दळवी(नायकवडी) यानेही पैसे मिळवून देण्याचा बहाणा करत कार्यालयात बोलावून पिस्तूलाचा धाक दाखवला . तर प्रकाश फाले याने कोयत्याचा धाक दाखवत शिवीगाळ केली.

Leave A Reply

Your email address will not be published.