संस्कृतीजतनासोबत महिला सक्षमीकरण

– राधिका बिवलकर

महिला सक्षमीकरणासाठी सरकार असंख्य योजना राबवते. शहरी भागात सरकारचा उद्देश काही अंशी सफल झाला असला तरी ग्रामीण भागात, खेड्यात आणि दुर्गम भागात अजूनही महिला पुरुषांच्या उत्पन्नावरच अवलंबून आहेत. शहरातही अशी काही कुटुंब आजही आहेत की, तेथे महिलांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात नाही. असाच अनुभव घेणाऱ्या कोलकत्याच्या सुमन सोनथालिया यांनी महिला सक्षमीकरणासाठी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी आकृती आर्ट क्रिएशन नावाची संस्था साहिबाबाद येथे सुरू केली. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वस्तू तयार करणाऱ्या आकृती क्रिएशनचा राष्ट्रपतींनी देखील गौरव केला आहे. महिलांना रोजगार देण्याबरोबरच दुर्गम भागातील संस्कृती शहरात आणि देशाबाहेर पोचवणे यासाठी सुमन झटत आहेत. याकामी त्यांना अडीचशे महिलांचा हातभार लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुमन सोनथालिया यांचा जन्म कोलकता येथे पुराणमतवादी कुटुंबात झाला. येथील मुलांना संधीअभावी करिअरवर पाणी सोडण्याची वेळ येत असे. कला क्षेत्र तर सुमन यांच्यासाठी दुर्मीळ संधी होती; परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. जोपर्यंत चांगली संधी मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी कलासाधना सुरूच ठेवली. लग्नानंतर बी. बी. संथोलिया यांच्या मदतीने कला क्षेत्रात करिअर करण्याचे निश्‍चित केले.

संथोलिया हे मोठे व्यापारी होते. आकृती आर्ट क्रिएशनची स्थापना सुमन यांनी केली. या माध्यमातून त्यांनी वारली पेंटिग विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या कामी सुमन यांच्या पतीने पाठबळ दिले. कालांतराने सुमन यांनी काढलेल्या वारली पेंटिंगला मागणी वाढू लागली आणि आज सुमन यांचे नवी दिल्लीत साहिबाबाद येथे स्किल इंडिया ट्रेनिंग सेंटर आहे. याठिकाणी विविध प्रकारचे हॅंडक्राफ्ट वस्तू तयार केल्या जात असून जगभरातून मागणी वाढतच चालली आहे. हॅंडीक्राफ्टची रचना करणाऱ्या बहुतांशी महिला असून त्यात अंध महिला कारागिरांचाही समावेश आहे, हे विशेष. जेव्हा सुमन यांनी हॅंडीक्राफ्टचा व्यवसाय सुरू करण्याचे निश्‍चित केले तेव्हा त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला अगोदर संधी दिली.

सुमन यांनी साकारलेल्या चित्रांना, कलेचा परिसरात आणि कालांतराने सर्वत्र प्रसार झाला. नोकरदार पतीवर अवलंबून असलेल्या महिलांना याठिकाणी काम देण्यात आले आणि त्यांच्या अंगी स्वावलंबीपणा आणला. आजमितीस सुमारे अडीचशे महिला सुमन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यात दहा अंध महिलांचा समावेश आहे. इंटेरिेअर डेकोरेशनमध्ये मागणी असणाऱ्या वस्तूंची निर्मिती सुमन यांची कंपनी करत आहे. ही कलाकुसर राष्ट्रपती भवनापर्यंत पोचली आहे. आकृती आर्ट क्रिएशन ही मोठा नफा कमवण्यासाठी स्थापन झालेली नसल्याचे सूमन यांनी स्पष्ट केले आहे.

वारली, मधुबणी, धोक्रा आणि कलमकारी या महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील आदिवासी कला संस्कृतीपासून प्रेरणा घेत विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते. आदिवासी कला आणि संस्कृती जगासमोर आणणे आणि तिचे जतन करणे हा आमचा उद्देश असल्याचे सुमन सांगतात. याठिकाणी काम करणाऱ्या महिलांचा उदरनिर्वाह योग्य रितीने व्हावा आणि कलेचाही प्रसार व्हावा यासाठी आकृती काम करत असल्याचे सुमन सांगतात. फर्निचर, पेटिंग, बल्ब, ट्रे, ज्वेलरी, बॉक्‍स, वॉल क्‍लॉक, वाइंड चिमणी यासारखे असंख्य वस्तू तयार केल्या जातात. यातील बहुतांशी वस्तू इंटेरिअर डेकोरेशनला पूरक असून त्या इकोफ्रेंडली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)