राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना : अंदाजपत्रक संपताना सुरू झाले उपक्रम
पुणे – महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेकडून राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे. यासाठी अंदाजपत्रकात तब्बल 3 कोटींची तरतूद असून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम प्रभागनिहाय घेण्यासाठी ही रक्कम सर्व प्रभागांमध्ये विभागून दिली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिलांसाठी उपक्रम घेण्यात आले आहेत. तर 31 मार्चला अंदाजपत्रक संपत असल्याने काही प्रभागांसाठीच्या निविदा क्षेत्रीय कार्यालयांकडून काढल्या आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी महिला नगरसेविकाही उदासिन असल्याचे चित्र आहे.
महापालिकेकडून काही वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली आहे. त्यांतर्गत प्रत्येक प्रभागात महिलांसाठी आरोग्य, प्रशिक्षण, स्वयंरोजगार, स्वरक्षनाचे धडे, वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने असे महिला संबंधित उपक्रम राबविणे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी प्रत्येकवर्षी अंदाजपत्रकात विशेष तरतूदही केली जाते. या योजनेसाठी 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सुमारे 3 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद या योजनेचे काम पाहणाऱ्या समाज कल्याण विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास विभागून देत प्रत्येक प्रभागास सरासरी 6 लाखांपर्यंतचे उपक्रम घेण्यास मान्यता देण्यात आली. त्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली.
मात्र, गेल्या वर्षभरात अवघ्या पाच ते आठ प्रभागांतच या योजनेचे उपक्रम झाले आहेत. तर मार्चअखेर असल्याने आणखी काही प्रभागांसाठी निविदा काढल्या आहेत. त्यामुळे निधी असतानाही महिलांसाठी उपक्रम राबविण्यास प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनाही वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.