पुणे(प्रतिनिधी) – वटपौर्णिमेला नटून थटून महिला वडाची पूजा करत असल्याचे चित्र दरवर्षी दिसते. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत घराच्या जवळपास वडाची झाडाची पूजा केली. तर अनेकांनी घरामध्येच प्रतिकात्मक वडाची पूजा केली.
एकच पती पुढील सात जन्म मिळावा, यासाठी महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करतात. वड हा वृक्ष अनेक वर्षे आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास धरतात. पारंपरिक वेशात तयार होऊन सामूहिक वडाची पूजा करतात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे महिलांना सामूहिकपणे वटपूजन करणे शक्य नव्हते. यावर उपाय म्हणून महिलांनी उपवास धरून घरीच पूजन केले. तर अनेकांनी घरीच वडाचे रोपटे लावून, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.
सालाबादाप्रमाणे यंदा वडाच्या पाराजवळ गर्दी नव्हती. यंदा झाडांच्या फांद्या न तोडता वटपौर्णिमा झाली. महिलांनी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच पूजा केली. पूजेसाठी सोसायटीच्या बाहेर न पडता पूजन करता यावे, यासाठी काही सोसायट्यांमध्ये एकत्रित वट पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
अनेकांनी मास्क लावले होते. एकमेकींपासून सुरक्षित अंतर ठेवून वडाला फेऱ्या मारल्या. बहुतांशी जणींनी पारंब्या असणारे वडाचे चित्र, रांगोळी काढून त्याची पूजा केली. यावेळी महिलांनी चित्राचे पूजन करून, नैवेद्य दाखवला.