निमोणे (वार्ताहर)- मजुरी करणाऱ्या दोन महिलांना घरात शिरून मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना येथे रविवारी (दि. 24) निमोणे येथे घडली.
सिंधू सूर्यभान गव्हाणे (वय 60) यांनी तक्रार दिली आहे. यावरून उमेश पवार, गणेश पवार, सागर पवार व दोन महिला (पूर्ण नावे समजली नाहीत, सर्व रा. गणेगाव दुमाला, ता. शिरुर) तसेच एक महिला व एक पुरुष (नाव समजली नाहीत, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमोणे येथे रविवारी दुपारी सिंधू गव्हाणे यांच्या घरात उमेश पवार व सहाजण शिरले. त्यांनी गव्हाणेंना घरात कोंडून घर पेटवून देऊ अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केली. तर काठीने व विटाच्या तुकड्याने सिंधू गव्हाणे तसेच मंदा नावाख महिलेच्या डोक्यात मारले. पुढील तपास पोलीस ठाण्याचे नाईक थेऊरकर हे करीत आहेत.