Mumbai Crime | पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही. एकीकडे हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना घडली आहे. पाण्यात गुंगीचं औषध मिसळून मुलीला प्यायला देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे.
अब्दुल मोतिन खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवले. त्यानंतर पाण्यात गुंगीचं औषध मिसळून तिला प्यायला दिले. पाणी प्यायल्यामुळे तिला गुंगी आली. ज्यानंतर दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचं समजले. त्यावेळी आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी दिली.
ही तरुणी घरी आल्यानंतर तिने घरी ही घटना सांगितली. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. तरुणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे ज्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, राज्यात सातत्याने होणाऱ्या या घटनेनंतर महिला सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.