नवी दिल्ली : भारतीय व्यक्तीस अवकाशात पाठवण्यासाठी आखलेल्या इस्रोच्या गगनयान मोहिमेतील पहिल्या टप्प्यात महिलेचा समावेश होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची माहिती इस्रोकडूनच देण्यात आली आहे. कारण लष्करातील वैमानिकांमधून या अवकाशवारीसाठी स्त्री-पुरुषांची निवड करण्यात येत असून चाचणी वैमानिकया पदावर एकही महिला नसल्याने कुठल्याही महिलेची निवड यात होण्याची शक्यता दिसत नाही असे इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्यातरी महिलेला अवकाशात पाठवण्याची शक्यता नसली असली तरी आगामी समानव योजनात महिलेची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या गगनयान मोहिमेसाठी संभाव्य उमेदवारांची निवड सुरू करण्यात आली असून ती पुढील महिन्यात पूर्ण होणार असून निवड झालेल्या व्यक्तींना रशियात नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. पहिली गगनयान अवकाश मोहीम 2022 मध्ये अपेक्षित असून त्यात तीन अवकाशवीरांना पृथ्वीबाहेरच्या कक्षेत पाठवले जाणार आहे. त्यांची निवड लष्कराच्या चाचणी वैमानिक म्हणजे टेस्ट पायलटमधून केली जाणार आहे. यापूर्वी ज्या देशांनी अशा मोहिमा केल्या त्यांनी चाचणी वैमानिकाची निवड त्यासाठी केली होती, त्यामुळे इस्रोनेही चाचणी वैमानिक हा निकष ठेवला आहे. पण लष्करात महिला चाचणी वैमानिक नाहीत त्यामुळे गगनयान मोहिमेत महिलेच्या निवडीची शक्यता कमी आहे.