स्त्रिया व पर्यावरण-एक अतूट नाते

माधुरी तळवलकर 

पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन मानला जातो. पर्यावरण आणि स्त्री यांचा निकटचा संबंध आहे. स्त्री ही फार सहजपणे निसर्गाशी एकरूप होते. निसर्गात जशी सृजनशीलता आहे, तशीच ती स्त्रीच्याही अंगी आहे. आणि जी व्यक्ती काहीतरी निर्माण करते, मूल जन्माला घालते, संसार मांडते, ती निसर्गाच्या सृजनतेलाही प्रतिसाद देऊ शकते. जिला निर्मितीतला आनंद कळलेला असतो, ती सहसा कोणतीही गोष्ट नष्ट करण्यास तयार होत नाही. त्यामुळेच पर्यावरणाच्या लढ्यात स्त्रिया नेहमीच अग्रभागी असतात.

अगदी अशिक्षित आणि गरीब स्त्रियांनीही पर्यावरणाच्या बाबतीत फार मोठे काम करून ठेवले आहे. आज आपण असे काम केलेल्या दोघींचा परिचय करून घेऊ या. सालूमरदा थिमक्का यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आयुष्यभर झाडे लावण्याचे काम केले. जवळजवळ चारशे मोठमोठे वृक्ष त्यांनी लावले, जोपासले. कर्नाटक राज्यातील बेंगळूरुजवळील हुळीकल ते कुडूर या रस्त्यावर हे वटवृक्ष आज खंबीरपणे उभे आहेत. थिमक्का यांचा जन्म कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातील खेड्यात झाला. घरची गरीबी. थिमक्कचे लग्न झाले. पण त्यांना मूल झाले नाही. मग ह्या जोडप्याने झाडांनाच जन्म देण्याचे, त्यांचे पालनपोषण करून त्यांना मोठे करण्याचे ठरवले. या दांपत्याने आसपासच्या वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्यांची रोपे तयार केली.

जवळपासच्या भागात ती लावली. ती चांगली रुजली, वाढली. मग ह्या दोघांचा उत्साह वाढला. रोपे तयार करून ती व्यवस्थित लावायची, त्यासाठी थोडे लांब जावे लागले तर तिकडे जाऊन ती लावायची, त्यांची निगा राखायची ह्याचा त्यांना नादच लागला. गुरांनी खाऊ नये म्हणून त्यांनी झाडांना काटेरी कुंपण घातले. पाण्याच्या बादल्या वाहून नेऊन त्यांना पाणी घातले. सुरुवातीला रोपे लावतानाच ते पावसाळ्याच्या सुरुवातीला लावत. म्हणजे मग ती नैसर्गिक पाण्यात चांगली जोम धरत.

आज थिमक्कांचे वय शंभर वर्षांचे आहे. झाडे भलीमोठी झाली आहेत. त्यात त्यांनी झाडांचा प्रकारच मोठ्या वृक्षांचा निवडला. वडाची झाडे विस्तारली, पसरली. आज या झाडांच्या नुसत्या लाकडांची किंमत केली तरी लाखाच्या घरात आहे. बाकी मोठ्या वृक्षाचे फायदे तर केवढे मिळतात! पांथस्थांना विशाल सावली, पशुपक्ष्यांना निवारा, चारा… आणि शिवाय पर्यावरणापासून मिळणारे अनेक फायदे! म्हणजे प्राणवायूचा भरपूर पुरवठा, उष्णतेला प्रतिबंध, मुळांनी मातीपाणी धरून ठेवणं… असे कितीतरी!

सुदैवाने थिमक्कांच्या कामाची सरकारदरबारी नोंद घेतली गेली. त्यांना देशी-परदेशी अनेक पुरस्कार मिळाले. इतकेच नव्हे तर दरवर्षी बीबीसी शंभर प्रभावी स्त्रियांची नावे जाहीर करते; सोळा सालच्या जागतिक प्रभावी स्त्रियांमधे त्यांनी जगातील पहिल्या प्रभावी शंभर स्त्रियांमधे थिमक्कांचा समावेश केला.

अमेरिकेने पर्यावरणाचे शिक्षण देणाऱ्या कॅलिफोर्निया येथील लॉस एंजेलिस आणि ऑकलंड येथे संस्था स्थापन केल्या. या संस्थांचे नाव आहे, “थिमक्का रिसोर्सेस फॉर एनव्हायरनमेंट एज्युकेशन!’ थिमक्कांच्या पतीचे निधन होऊन आता बरीच वर्षे झाली. त्याही आता वयाच्या शंभरीत आहेत. पण या दोघांनी केलेले काम चिरंतन राहील. अजूनही थिमक्का आपल्या गावात पाणी साठवण्याच्या कामात सक्रीय आहेत. त्यांच्या गावात हौद बांधून त्यात पावसाचे पाणी साठवले जाते. कसलेही शिक्षण नाही, घरची गरिबी, मजुरी करून पोट भरणाऱ्या या बाईने किती मोठा विचार केला आणि केवढे कायमस्वरूपी काम करून ठेवले, हे पाहिले की आपण थक्क होतो.

पर्यावरणाच्या लढ्यात कणखरपणे उभे राहणाऱ्या स्त्रियांची परंपराच आपल्या भारतात आहे. इ.स.1730मधे राजस्थानातील खेजडी गावात खेजरीची झाडे अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडत होती. तिथल्या राजाच्या महालासाठी लाकूड हवे म्हणून त्याने ती झाडे कापायला सैनिक पाठवले. पण स्त्रियांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान केले. चिपको आंदोलनातही स्त्रियांनी कडवी झुंज दिली. गौरादेवी, सुरक्षादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांच्या पुढाकाराने जो प्रचंड विरोध झाला, त्यापुढे सरकारला माघार घ्यावी लागली. आजही पर्यावरणासाठी अनेक स्त्रिया झुंजारपणे लढत आहेत. पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनीच अशा कर्तबगार स्त्रियांचा कित्ता गिरवला पाहिजे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.