Wayanad landslides | वायनाडमध्ये ३० जुलैच्या रात्री मेपाडी पंचायतीच्या चार गावांत भूस्खलन झाले. या दुर्घटनेत २०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून, अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. मात्र या भूस्खलनाची पहिली सूचना देणाऱ्या दवाखान्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मेपाडी भागात भूस्खलन झाले आहे, याची पहिली माहिती चुरलमला गावात राहणाऱ्या निथू जोजो यांनी दिली होती.
निथू जोजो यांनी वायनाड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, मेपाडी येथे फोन करून भूस्खलन झाल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनंतर बचाव पथक रवाना झाले. निथू जोजो यांच्या फोननंतर रुग्णालयाने अग्निशमन दल, सरकारी यंत्रणेला याची माहिती देऊन तत्काळ चुरलमलाच्या दिशेने धाव घेतली. पण भूस्खलनामुळे चौफेर गाळ, दगडांचा ढिगारा पसरला होता. रस्तेही त्याखाली दडपले गेले. चुरलमला गावात बचाव पथक पोहोचेपर्यंत दुसऱ्यांदा भूस्खलन होऊन चुरलमला गावातील निथू जोजो यांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर शनिवारी निथू यांचा मृतदेह बचाव पथकाला मिळाला. Wayanad landslides |
निथू जोजो यांनी ज्या वायनाड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला फोन करून भूस्खलन झाल्याची माहिती दिली. त्याच रुग्णालयात त्या काम करीत होत्या. या दुर्घटनेत संस्थेचे आणखी चार सदस्य मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, निथू जोजो यांच्या घरात त्यांचे पती जोजो जोसेफ, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि शेजारचे लोक एकत्र झाले आणि घराबाहेर पडले.
तर निथू जोजो मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होत्या, मात्र पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मोठे भूस्खलन झाले. भूस्खलनाचा गाळ वेगाने गावात शिरला आणि मोठमोठे दगडही घरावर आदळू लागले. दरम्यान, जोजो जोसेफ यांनी कुटुंबातील इतर सदस्य आणि काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले, पण निथू कुठेच आढळल्या नाहीत. अखेर शनिवारी चिखल-मातीचा ढिगारा बाजूला करताना निथू जोजो यांचा मृतदेह आढळून आला. Wayanad landslides |
चार चिमुकलांची सुखरूप सुटका
तर दुसरीकडे, वायनाड येथे मदत पथकातील जवानांनी जीव पणाला लावून घनदाट जंगलात एका गुहेमध्ये आसरा घेतलेल्या चार चिमुकलांची सुखरूप सुटका केली आहे. या कामगिरीमुळे जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कालेपट्टा रेंजच्या जंगलात एक महिला या मुलांना अन्नपाणी मिळावे म्हणून भटकत असल्याचे नजरेला पडले. Wayanad landslides |
तिची विचारपूस केल्यानंतर त्या महिलेने जवानांना गुहेमधील आपली चार मुले दाखवली. ही मुले 1 ते 4 वर्षे वयाची आहेत. 8 तासांच्या विशेष मोहिमेनंतर ही आदिवासी मुले आणि त्यांच्या आईला सुरक्षित स्थळी आणण्यात आले. वायनाडच्या पानिया समुदायातील हे कुटुंब डोंगरमाथ्यावरील एका गुहेत अडकले होते. त्या गुहेच्यावर खोल दरी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
हेही वाचा: