कोयनानगर – कोयनानगर बाजारपेठेत दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चालविणाऱ्या एका महिलेस कोयनानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तिच्याकडून पोलिसांनी दोन हजार रुपयाच्या दोन, तर पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ठाणे (वर्तकनगर) येथील एक 32 वर्षीय अनोळखी महिला चिपळूण-कराड दरम्यान स्वतःच्या खाजगी वाहनाने कुटूंबासह प्रवास करत असताना तिने कोयना भागातील देशपांडेवाडी गावातील कुंभार किराणा स्टोअर्समध्ये दोन किलो साखर विकत घेतली. संबंधित महिलेकडे सुट्टे पैसे असतानाही तिने दुकानदाराला पाचशे रुपयांची बनावट नोट दिली.
सदर नोट बनावट असल्याचा संशय दुकानदाराला आल्याने त्याने शिताफीने कोयना पोलिसात धाव घेत हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेची झाडाझडती घेतली असता तिच्याकडे दोन हजार रुपयांच्या दोन, तर पाचशे रुपयांच्या दोन अशा चार बनावट नोटा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.