नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवस्त्र करून धिंड काढण्याची धमकी देत नातेवाईकांनी एका महिलेला ट्रॅक्टर अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. नाशिक शहराजवळील शिलापूर शिवारातील गट नं. १६ आणि १७ मध्ये २९ मे २०२३ रोजी ही घटना घडली होती.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत कहांडळ, प्रकाश कहांडळ, भानुदास कहांडळ, भास्कर कहांडळ आणि विश्राम कहांडळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हे तक्रारदार यांचे नातेवाईक आहेत. २९ मे रोजी पीडिता आपल्या शेतात काम करत असतांना संशयितांनी तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा संशयितांनी तिला कपडे काढून धिंड काढण्याची धमकी दिली. प्रकाश कहांडळने तिचा विनयभंग केला. याबाबत पोलिसांकडे दाद मागूनही न्याय न मिळाल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भगवंत घोडे हे करीत आहेत.
धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खुन
सातपुर कामगार नगरमधील एका युवकाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खुन केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ८) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कॉलेजरोडवरील संत कबीर नगरमधील मुख्य रस्त्यावर घडली आहे. अरुण राम बंडी (२९, रा.कामगार नगर, सातपूर) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने दंगल नियंत्रण पथकाचे काही जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान गंगापूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेत तिघा हल्लेखोर संशयिताना ताब्यात घेतले. यामधील दोघे जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.