Woman Saves Youth – गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा जीव वाचवण्याचे धाडसी काम कौशल्या फापाळे या महिलेने केले आहे. बघ्यांची गर्दी मदतीसाठी पुढे येत नसताना, या रणरागिणीने माणुसकी दाखवत तरुणाला वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने जुन्नर तालुक्यात त्यांचे मोठे कौतुक होत आहे. मिळालेली माहिती अशी की, संभाजीनगर येथील सागर चंदनसे (वय २७) हा तरुण आणे घाट उतरल्यानंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. धडक इतकी जोरात होती की, तरुणाच्या पायाला आणि खांद्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. अपघातस्थळी जमलेल्या लोकांना तरुण मृत झाल्याचा संशय आल्याने कोणीही त्याला हात लावत नव्हते. याचवेळी जवळच राहणाऱ्या कौशल्या भालचंद्र फापाळे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि पतीच्या मदतीने जखमीला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तरुणाच्या दोन्ही पायांना दोन ते तीन ठिकाणी फॅक्चर असून खांद्यालाही मोठी इजा झाली आहे. वेळेत उपचार मिळाल्याने हा तरुण शुद्धीवर आला असून फापाळे यांनी त्याचे साहित्य आणि मोबाइल सुरक्षितपणे त्याच्या मित्राच्या स्वाधीन केला. वेळेत मदत मिळाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. “माझा स्वतःचा मुलगा समजून मी आईच्या मायेने त्या अपघातग्रस्त तरुणाला मदत केली. अपघातग्रस्ताला तातडीने मदत मिळाली पाहिजे, कारण त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही.” – कौशल्या फापाळे, गुळुंचवाडी.