मावळ, – वडगावकडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीस जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार पती जखमी झाला आहे. तळेगाव-चाकण महामार्गावर परुळेकर विद्यानिकेतन ते बुलेट शोरुम दरम्यान सोमवारी (दि. २) सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
उषा शांताराम काटकर (वय ४५, रा. नाणोली मावळ, टाकवे) असे मयत महिलेचे नाव असून तिचा पती शांताराम सबाजी काटकर (वय ५०, रा. नाणोली मावळ) हे अपघातात जखमी झाले आहेत. अपघतानंतर कंटेनरचालक बाळासाहेब नागरगोजे हा स्वत:हून पोलिसांकडे हजर झाला.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे करीत आहेत. तळेगाव-चाकण महामार्गाचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु असून आणखी किती बळी जाणार आहेत, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.