इस्लामाबाद – पाकिस्तानातील एका महिलेने एकाचवेळी तब्बल 7 मुलांना जन्म दिला आहे. खैबर पख्तुन्वा प्रांतातल्या एबोटाबादेतील एका खासगी रुग्णालयात या महिलेने या बालकांना जन्म दिला आहे. या महिलेच्या पोटात 5 गर्भ असल्याचे अल्ट्रासाऊंड आणि अन्य तपासण्यांमध्ये ध्यानात आले होते. मात्र प्रत्यक्ष्यात प्रसुतीच्यावेळी 7 नवजात बालकांचा जन्म झाला. हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत. सध्या ही सर्व नवजात बारके आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
खैबर पख्तुन्वा प्रांतातील एबोटाबादेतील यार मोहम्मद यांची पत्नी गर्भवती होती. त्यांना प्रसुती वेदना सुरू झाल्यावर जिन्ना इंटरनॅशल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच ही प्रसूती झाली. ही महिला रुग्णालयात आली तेंव्हा ती 8 महिन्यांची गर्भवती होती. ती रुग्णालयात पहिल्यांदाच आली होती. तपासणी केल्यावर तिचा रक्तदाब खूप जास्त असल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेशिवाय कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. मात्र ही शस्त्रक्रिया खूपच अवघड होती. मात्र डॉक्टरांच्या टीमने तासाभराच्या शस्त्रक्रियेनंतर ही प्रसूती केली.
जन्म झालेल्या बालकांमध्ये चार मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. एकाचवेळी 7 बालकांचा सांभाळ करण्यास आपल्याला काही अडचण असणार नाही, असे यार मोहंम्मद यांनी म्हटले आहे. मोहंम्मद यांचे एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे कुटुंबातील सर्वजण बालकांचा सांभाळ करण्यास मदत करतील, असे त्यांनी सांगितले. या 7 नवजात बालकांव्यतिरिक्त यार मोहम्मद यांना दोन लहान मुलीही आहेत. याचा अर्थ मोहंम्मद यांच्या घरात एकूण 9 मुले असणार आहेत.