एसटी व कारच्या धडकेत येणपे येथे महिलेचा मृत्यू

कराड  – येणपे (ता. कराड) येथे सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास शेडगेवाडी- कराड एसटी बसला मुंबईहून रत्नागिरीकडे भरधाव वेगाने निघालेल्या स्वीफ्ट कारची धडक बसून विजया विनायक नाईक (वय 42, रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, कामना सोसायटी, दादर मुंबई) यांचा मृत्यू झाला. अन्य चारजण गंभीर जखमी तर दहा जणांना किरकोळ दुखापत झाली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईहुन किर कुटुंबीय कारने (एम. एच. 47 एन-7830) रत्नागिरीला निघाले होते. कराड आगाराची एसटी बस (एम. एच. 14 बीटी 4859) शेडगेवाडीहून कराडच्या दिशेने येत होती. ही बस येणपे येथील बस स्टॉपच्या पाठीमागे शालेय विद्यार्थी घेण्यासाठी काही वेळ थांबली होती. त्यानंतर तेथून पुढे निघताच काही अंतरावर समोरून भरधाव वेगाने कार एसटीच्या दिशेने येत असल्याचे एसटी चालक संजय चव्हाण यांनी पाहिले.

त्यामुळे चालकाने एसटी बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. मात्र, कार एसटीवर आदळली. जोरदार धडकेत कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. या अपघातात कारचा पुढचा भागाचा चक्काचूर झाला होता. कारमधील अजय दत्तात्रय कीर (वय 43), अंजली दत्तात्रय कीर (वय 42), सुवर्णा दत्तात्रय कीर (वय 70), विजया विनायक नाईक (वय 42, चौघेही रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, कामना सोसायटी, दादर मुंबई) व कारचालक इज्जाज अब्दुल अज्जीज मकरानी (वय 29, रा. अंधेरी) गंभीर जखमी झाले.

विजया नाईक यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एसटी बसमधील शालेय विद्यार्थी श्रेया शिरसट, मेघा शिरसट, नम्रता शिरसट, अजय जाधव व अन्य नावे न समजलेले पाच विद्यार्थी अशा दहा जणांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर उंडाळे ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. कारमधील चार जणांना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येणपे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. अपघाताची नोंद कराड तालुका पोलिसात झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.