शिक्रापूर परिसर पुन्हा हादरला; संपर्कातील व्यक्ती व कुटुंबीयांना केले क्वारंटाइन
तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी) – येथील एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील एका महिलेला गुरूवारी (दि. 7) रात्रीच त्रास होऊ लागल्याने गावातीलच खासगी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर तिला करोना विषाणूची काही लक्षणे दिसून आली. पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले.
ही महिला करोनाबाधित असल्याचे अहवालात समोर आले. ही महिला तळेगावातील दोन खासगी दवाखान्यांत उपचारासाठी गेली असल्याने खासगी हॉस्पिटलचे कर्मचारी व महिलेच्या कुटुंबातील अकरा व्यक्ती यांना गावातीलच मंगल कार्यालयात 14 दिवस होम क्वारंटईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेतले आहेत. यापूर्वी सणसवाडी आणि शिक्रापूर या जवळच्या गावामध्ये करोना रुग्ण आढळले. मात्र नागरीक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने या रोगाला एक प्रकारे आमंत्रण दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे गावाला जोडणारे रस्ते पूर्ण बंद करण्यात आले असून खबरदारी घेतली जात आहे. गावातील दोन्ही दवाखाने आरोग्य विभागाने बंद केले आहे.
अशी आहे शिक्रापूर परिसरातील करोनाची स्थिती….
16 मार्च – पहिला रुग्ण सणसवाडीत आढळला त्याच्या संपर्कातील आलेल्या शिक्रापूर येथील खासगी दोन हॉस्पिटलच्या डॉक्टरसह 17 जण क्वारंटाइन.
14 एप्रिल – शिक्रापूरमधील एका सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 144 स्त्री आणि पुरुष क्वारंटाइन.
18 एप्रिल – विठ्ठलवाडी येथील दोन वर्षांच्या मुलीचा अहवाल करोनाबाधित.
23 एप्रिल – शिक्रापूरमधील 40 वर्षीय करोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू .
7 मे – तळेगाव ढमढेरे येथील एका महिलेचा अहवाल करोना बाधित .
8 मे – या करोनाबाधित महिलेची प्राणज्योत मालवली .
नागरिकांनी घाबरून न जाता संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करा. अनावश्यक गर्दी करू नका. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी थुंकू नका, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, अनाआवश्यक घराबाहेर पडू नका. -प्रज्ञा घोरपडे, वैद्यकीय अधिकारी, तळेगाव ढमढेरे.
तिच्या मुलामुळे लागण झाल्याचा अंदाज…
बाधित महिलेचा मुलगा पुण्यावरून भाजीपाला वाहतूक करत होता. त्याला पुण्यातच करोना रोगाची लागण झाल्याने या महिलेच्या संपर्कात येऊन या महिलेला लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही महिला तळेगाव बाजार मैदानमध्ये भाजी विक्री व्यवसाय करत होती. यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी करण्यात येणार आहे.