पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी (दि. 24) रात्री करोनाने 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिला पुण्यात राहण्यास होती. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दम्याचा जुना आजार होता.
संबंधित महिलेला रुग्णालयामध्ये 23 तारखेला उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हापासून ती अत्यवस्थ होती. त्याच दिवशी तिच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. काल सायंकाळी तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. तिच्या कुटुंबातील आणखी दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत एकूण 288 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील 274 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर, 14 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील चौघांचा 14 दिवसांनंतर अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी घरी सोडण्यात आले.
तर, सध्या 8 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्णालयात आत्तापर्यंत उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.