बाराबंकी – ब्लॅक फंगसची लागण झालेल्या बाराबंकी येथील महिलेला लखनौ येथील केजीएमयू रुग्णालयात १७ तास प्रतिक्षा करूनही बेड मिळाला नाही. या कालावधीत पिडीत महिला कधी कारमध्ये तर कधी स्टेचरवर होती. अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर एका दलालाने ३० हजार रुपये घेऊन व्हेंटीलेटर बेड मिळवून दिला. मात्र रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धनोखर चौराहा येथील विवेक वैश्य यांनी सांगितलं की, त्याच्या मातोश्री कुसुम वैश्य (५५) यांना २० एप्रिल रोजी करोनाची बाधा झाली होती. त्यांना ३० एप्रिल रोजी सफेदाबाद येथील हिंद संस्थान रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान २० मे रोजी डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांना ब्लॅक फंगस झालायं.
दरम्यान रुग्णालय प्रशासनाने ब्लॅक फंगससाठीचं इंजेक्शन उपलब्ध नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही दोन लाख रुपयांमध्ये ब्लॅक फंगससाठीचं आवश्यक इंजेक्शन ब्लॅकमध्ये खरेदी केलं. मात्र हे इंजेक्शन रुग्णालयाकडून मातोश्रीला दिलं नाही, असही विवेक वैश्य यांनी म्हटलं.
काही कालावधीनंतर डॉक्टरांनी रुग्णाला पीजीआयमध्ये हलविण्याच्या सूचना केल्या. मात्र दोन दिवस वाट पाहूनही तिथं बेड मिळाला नाही. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता, रुग्णाला केजीएमयू रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आलं. मात्र तिथंही बेड मिळाला नाही. त्यामुळे आईला बराच वेळ कारमध्येच बसवून ठेवलं. मात्र आपात्कालीन परिस्थिती असताना केजीएमयूमध्ये उपचार करण्यात आला नसल्याचा आरोप विवेक यांनी केला आहे.
दरम्यान दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने एक लाखांची मागणी करत व्हेंटीलेटर बेड देण्याचं आश्वासन दिलं. त्याला ३० हजार रुपये देऊन आम्हाला व्हेंटीलेटर मिळालं. मात्र लवकर उपचार न मिळाल्याने आईचा एका तासात मृत्यू झाल्याचा आऱोप विवेक वैश्य यांनी केला.