पुण्यात मुलींचा जन्मदर धक्कादायकरित्या घसरला : सुशिक्षित शहराच्या प्रतिमेला तडा
पुणे – जगभरात महिला दिनाची धामधूम सुरू असतानाच, 2019 मध्ये पुण्यातील मुलींचा जन्मदर धक्कादायकरित्या घटल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत या जन्मदराचे प्रमाण सरसरी 932 वर असताना, 2019 मध्ये मात्र ते तब्बल 23 ने घसरले आहे. गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपातांवर नियंत्रण आणण्यासाठी तपासण्या आणि कारवाई होत असतानाही, हा घसरलेला जन्मदर सावित्रीबाई फुलेंची कर्मभूमी आणि विद्येचे माहेरघर असलेल्या सुशिक्षित पुण्याच्या नावाला तडा देणारा ठरला आहे.
काही वर्षांपूर्वी पुण्यात मुलींचा जन्मदर 900 पेक्षाही खाली होता.
अवैध गर्भलिंग निदान, बेकायदेशीर गर्भपात केंद्र तसेच मुलगाच पाहिजे या अट्टहासापायी मुलींच्या जन्मदर कमालीचा घटला होता. ही स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून “पीएसीपीएनडीटी’ कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र विभाग, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही आहेत. त्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर खबरदारीही घेतली जात आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांत शहरात मुलींच्या जन्मदर तब्बल 29 ने घटला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 2016 मध्ये मुलींचा जन्मदर प्रमाण 932 होते. ते 2017 मध्ये 926 झाले. तर 2018 मध्ये ते 927 होते. मात्र, 2019 मध्ये त्यात लक्षणीय घट होत हे प्रमाण 904 वर आले आहे. हा आकडा आरोग्य विभागासाठीही चिंतेची बाब ठरत आहे.
पुण्यासारख्या शहरात मुलींचा जन्मदर घटणारी आकडेवारी चिंताजनक आहे. आरोग्य विभागाने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याखाली कडक कारवाई करणे आवश्यक आहे. अवैध गर्भपात केंद्रांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरात मुलींच्या जन्मदरात अचानक झालेल्या चिंताजनक घटीमागे आरोग्य विभागाची कारवाई सक्षमपणे होत नसल्याचे दिसत असून त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच