कोपरगाव शहरात मतिमंद महिलेवर अत्याचार

कोपरगाव  – शहरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय मतिमंद महिलेवर दोन तळीरामांनी अत्याचार केले. या दोघा तळीरामांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज शहरात सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जालिंदर कचरू त्रिभुवन (वय 35) व नवनाथ मच्छिंद्र वाघ (वय 40) यांनी मद्यधुंद अवस्थेत पीडित महिलेच्या घराशेजारील शेळ्या बांधण्याच्या गोठ्यात घुसून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडित महिलेच्या नातेवाईकांनी या आरोपींना पाहून आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले. दरम्यान अत्याचार करणाऱ्या नराधमांना नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यात आरोपी जालिंदर त्रिभुवन याच्या डोक्‍याला जबर मार लागून तो जखमी झाला. नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून दोघांना त्यांच्या ताब्यात दिले.

पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तिला पाठविण्यात आले. तेथे पीडितेची प्राथमिक तपासणी करून पुढील तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालय पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान पीडित महिला मतिमंद असल्याने तिला झालेल्या घटनेबाबत काहीच सांगता येत नसल्याने पोलिसांनी कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयातील शिक्षकांद्वारे तिच्याशी संवाद साधण्याची प्रयत्न केला. पीडित महिलेवर अत्याचार झाला की नाही, याबाबत पोलीस यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी संभ्रमात आहेत. त्यामुळे तिला पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

पीडितेच्या घराजवळच दारू अड्डा
पीडितेच्या घराच्या जवळच दारूचा अड्डा असून, या अड्ड्यावर आरोपी नेहमी दारू पिण्यासाठी येत असत. त्यामुळे पीडितेवर त्यांची नजर होती. आज संधी मिळताच त्यांनी पीडितेवर अत्याचार केले. त्यामुळे या दारू अड्ड्यावर कारवाई होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.