स्त्री एक पॉवर बॅंक

‘ए आई, आज मॅडमनी एक ग्रिटिंग बनवुन आणायला सांगितल होतं. मी विसरलेच. आता मॅडम शिक्षा करतील.’

रडवेल्या आवाजात शिवानीने सकाळी उठल्यावर आईला सांगितल. ‘रडू नको. मी बनवुन देते,’ असं म्हणत शिवानीच्या आईने एकीकडे डबा बनवला आणि घरात असलेल्या पत्रिका, टीकल्या वगैरे लावून छान ग्रिटींग बनवून दिलं. शिवानी खुश होवुन शाळेत गेली.

‘बायको, अगं काल इस्त्रीचे कपडे आणायचे राहिलेत. पटकन एक ड्रेस इस्त्री करुन देशील का?’ शिवाने बायकोला विचारले. बायकोने चहा, नाश्‍ता बनवून इस्त्री पण करुन दिली. ‘सुनबाई, अगं माझा चष्मा सापडत नाही. जरा शोधून देशील का?’ सूनबाईने लगेच चष्मा शोधून दिला.

मुलांच्या परीक्षेच्या काळात आई मुलांची खूप काळजी घेते. घरातलं वातावरण नीट ठेवणे. मुलांचा अभ्यास घेणे. अभ्यास करतात की नाही ते लक्ष ठेवणे. काही वेळा मुलं अभ्यास करताना झोपतात; म्हणून आई रात्री मुलांबरोबर जागी राहते, पहाटे उठून मुलांबरोबर बसते. बोर्डाची परीक्षा असेल तर मुलांकडून काही गडबड होवू नये, म्हणून ती परीक्षेचं वेळापत्रक कॅलेंडरवर लिहून ठेवते आणि मुलांना आल्यावर उद्याचा विषय कुठला ते सांगते. एवढी काळजी आई घेत असल्यामुळे बाबा बिनधास्त राहू शकतात.

सणावाराला तर स्त्रिया घरातली साफसफाई करणे, धार्मिक सण असेल तर ती सगळी तयारी करणे, घरात पक्वान्न करणे हे सगळे करुन स्वतः छान आवरुन हसतमुख राहते. त्यामुळे सणाचा उत्साह वाढतो.

घरातील माणसांच्या जीभेचे चोचले पुरवण्याच काम म्हणावं तर तसं अवघडच! त्याही बाबतीत ती आघाडीवर. कधी पतीराज म्हणणार, ‘आज मस्त गरम गरम कांदाभजी कर’ की ही लगेच मस्त भजी करुन वाढणार. तर कधी मुलं म्हणणार की, ‘आज पिझ्झा बनवशील?’ की या मुलांची पण फर्माइश पुरी. हल्ली स्त्रीया पण युट्युब वरचे व्हीडिओ पाहून किंवा गुगलवर रेसीपी बघून स्वतःला अपडेट ठेवतात आणि भारतीय पारंपारिक पदार्थांपासुन पंजाबी, चायनीज पदार्थ बनवून घरातल्यांना खुश ठेवतात.

कधी घरात पैशाची चणचण भासली तरी या घरातल्या बाईकडे कुठे तरी अडीअडचणीसाठी ठेवलेले पैसे असतात आणि वेळ आली की, ते पैसे काढून देते आणि प्रश्‍न सोडवते.अगदीच अटीतटीचा प्रसंग आला तर स्वतःचे दागिने गहाण ठेवून किंवा विकूनसुद्धा घरातील समस्या सोडवते.कोणी आजारी पडल तरी ती धीरानी परीस्थिती सांभाळते. आजारी माणसाला धीर देते, त्याची सुश्रुषा करते. घरातली अशी सगळी कामे करुन वेळ निभावून नेणारी स्त्री म्हणजे जणू पॉवर बॅंक! ती सगळ्यांना गरज लागेल तेव्हा पॉवर देतं असते. पण पॉवर बॅंक चार्ज असेल तरच तुमचा मोबाईल चार्ज होवू शकतो. तसंच घरातल्या स्त्रीचं सुध्दा कौतुक केलं, स्तुती केली, काळजी केली तर ती सुद्धा उत्साहाने आणि उमेदिने चार्ज होवुन तुम्हाला पॉवर देइल आणि घरातल्यांची बॅटरी डिस्चार्ज होणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.