विनातिकिट रेल्वे प्रवास पडणार महागात

पुणे – तिकीट न घेता फुकट प्रवास करणे आता महागात पडणार आहे. फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून “अशा’ प्रवाशांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर केली जाणार आहे. तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून याबाबत विचार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे-मळवली, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर, पुणे-बारामती या मार्गांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. ही कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. पुणे विभागामध्ये दरमहा हजारो जणांवर कारवाई करून देखील विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या “जैसे थे’च आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास फुकट्यांच्या संख्येला आळा बसण्याची शक्‍यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची माहिती प्रसिद्ध करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये प्रवाशांचे नाव, छायाचित्र, मोबाइल क्रमांक आदी माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. रेल्वेस्थानकांसह प्रसिद्धीमाध्यमांत ही माहिती प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासन विचाराधीन आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

6 महिन्यांत 82 हजार प्रवाशांवर कारवाई – एप्रिल ते सप्टेंबरमध्ये 82 हजार प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून 4 कोटी 63 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी याच कालावधीत 74 हजार प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले होते. त्यांच्याकडून 4 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.