अधिकारी कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र बंधनकारक
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या अ, ब, क संवर्गातील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगणक प्रशिक्षण घेतले नाही, त्यांनी संगणक प्रशिक्षण घेऊन 15 फेब्रुवारीपर्यंत प्रमाणपत्र सादर करायचे आहे.
अन्यथा त्यांच्यावर पदोन्नती रोखण्याची कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे. महापालिकेतील गट अ, ब, क संवर्गातील पदावरील नियुक्तीसाठी संगणक हाताळणे व त्याबाबतचे ज्ञान मिळविणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. त्यानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगणक हाताळणीबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतनवाढ व पदोन्नती रोखण्याची कारवाई करण्याचे निर्देश आहेत. महापालिका आस्थापनेवरील गट अ, ब, क अधिकारी, कर्मचारी डीओईएसीसी, सोसायटीच्या अधिकृत सीसीसी, किंवा ओ स्तर, ए, बी,सी. स्तरांपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण हवेत किंवा एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असे संगणक अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वयाची पन्नास वर्ष पूर्ण केली नाही. त्यांनी संगणक अर्हता धारण करावी. ते प्रमाणपत्र 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे अन्यथा होणाऱ्या पदोन्नतीकरिता ते अधिकारी व कर्मचारी स्वतः जबाबदार असतील असे निर्देश प्रशासनाने काढले आहेत.