पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी) शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्थानक, दापोडी व नारायणगाव या पाच एस.टी. आगारातील सुरक्षारक्षकांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले आहेत. यामुळे कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालविणार, असा प्रश्न सुरक्षारक्षकांना पडला आहे.
शहर व पुणे विभागातील पाच एस.टी. स्थानकात सुमारे 70 ते 75 सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. स्थानकातील सुरक्षारक्षक तीन शिफ्टमध्ये काम करतात. मात्र, या सुरक्षारक्षकांचे वेतन सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यापासून थकीत ठेवण्यात आलेले आहे. महिना उलटल्यानंतर दुसऱ्या महिन्यात 25 तारखेपर्यंत सुरक्षारक्षांचे पगार होतात. मात्र, आता सुरक्षारक्षकांना दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने कुटुंबाचा खर्च कसा भागविणार? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.
शिवाजीनगर स्थानकात पाच वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. याबाबत कोणाशी संपर्क साधल्यास उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे एका सुरक्षारक्षकाने सांगितले.
खासगी कंपनीला सुरक्षारक्षकांचे पैसे महामंडळ देत असल्याने या कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित कंपनीमार्फत केला जातो. सुरक्षारक्षकांच्या पगाराबाबत सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– यामिनी जोशी, एस.टी विभागीय नियंत्रक, पुणे