पाक-न्यूझीलंड मालिका ‘डीआरएस’शिवाय

आयपीएलमध्येच सगळे तंत्रज्ञ व्यस्त

लाहोर – न्यूझीलंडचा क्रिकेट संघ तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानचा दौरा करत आहे. मात्र, ही मालिका डीआरएसशिवाय खेळवावी लागणार आहे. अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी डीआरएस तंत्रज्ञ नियुक्‍त केले गेले असल्याने पाक व न्यूझीलंड यांच्यातील मालिकेसाठी डीआरएस तंत्रज्ञच उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दोन संघात 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. तत्पूर्वी, 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट मंडळासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. दोन्ही संघांना डीआरएस प्रणालीशिवाय संपूर्ण मालिका आयोजित करावी लागेल.

बीसीसीआयने आयपीएल 2021 सालच्या उर्वरित सामन्यांसाठी अमिरातीत खेळल्या जाणाऱ्या बहुतेक डीआरएस सिस्टम ऑपरेटरची नियुक्‍ती केली आहे. त्यामुळे पाकिस्तान-न्यूझीलंड मालिकेसाठी पाकिस्तानला आयसीसी मान्यताप्राप्त ऑपरेटर शोधण्यात अडचण उभी राहिली आहे. आयपीएल 2021 सालच्या मोसमातील उर्वरित 31 सामने अमिरातीत आयोजित केले जात आहेत.

या स्पर्धेतील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाईल. बीसीसीआयने पाकिस्तानच्या तुलनेत डीआरएस ऑपरेटर्सना 4 पटीने पैसे दिले आहेत आणि याच कारणामुळे ऑपरेटर्सनी या आंतरराष्ट्रीय मालिकेपेक्षा आयपीएलला प्राधान्य दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.