ट्रम्प प्रशासनाचे नवे धोरण
वॉशिंग्टन – आरोग्य विमा उतरवल्याशिवाय आता अमेरिकेत कोणालाही प्रवेश द्यायचा नाही किंवा ज्यांच्याकडे आरोग्य विषयक समस्यावरील औषधोपचारावरील बिल भरण्याची क्षमता नाही त्यांनाही अमेरिकेत प्रवेश द्यायचा नाही असे नवे धोरण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
आपल्या औषधोपचाराचा खर्च अमेरिकन आरोग्य व्यवस्थेवर टाकणार नाही असे सिद्ध करणाऱ्या नागरीकांनाच यापुढे अमेरिकेचा व्हीसा जारी करण्याची सुचना ट्रम्प प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांना केली आहे.
अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या नागरीकांवरील औषधोपचाराचा मोठा खर्च अमेरिकेच्या आरोग्य विभागाला करावा लागतो त्यातून अमेरिकेच्या मूळ नागरीकांपेक्षा अमेरिकेत बाहेरून येणाऱ्या नागरीकांवरच मोठा खर्च होतो, असे दिसून आल्यानंतर आमच्या देशाच्या करदात्यांच्या पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी ही उपाययोजना केली जात असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.
येत्या 3 नोव्हेंबर पासून ही उपाययोजना करण्यात येत आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्यांवर तसेच निर्वासित म्हणून दाखल होणाऱ्यांवरही अमेरिकेन मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत.