मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या महिलेने ट्विट करत “तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते’ असे म्हटले आहे. तक्रारदार महिलेने काही ट्वीट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तिने ट्वीट करत म्हटले आहे की, एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते, असे तीने ट्विट केले आहे.
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मी खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढ्या लोकांना एकत्र यावे लागत आहे. मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असे चित्र निर्माण झाले आहे. तुम्हाला जे लिहायचे आहे ते लिहित बसा. जर मी चुकीची होते तर एवढे दिवसांत माझ्याविरोधात तक्रार का केली नाही? मला पाठीमागे हटावे लागले तरी मला गर्व आहे की, मी एकटी लढले.”
दरम्यान, रेणू शर्मा नामक महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्याने देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.