पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “इतिहासाचे जतन करण्यासाठी सरकारकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याचा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या वारसास्थळ दत्तक योजनेअंतर्गत पुण्यातील शनिवारवाड्यासह, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी आदी स्थळे भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. त्याबाबत सुळे यांनी संताप व्यक्त करत ट्विट केले आहे.
देशातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसास्थळे खासगी संस्था आणि कंपन्यांना दत्तक देण्याच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकारने ही स्थळे भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला आहे.
सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरू केला. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. आम्ही याचा निषेध करत असून, सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.