परिवर्तनासाठीच वाई विधानसभा मतदारसंघातून माघार

पुरूषोत्तम जाधव; खंडाळ्यातील प्रचार दौऱ्यात विरोधकांचा खरपूस समाचार

सातारा – वाई विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षांत खंडाळा तालुका व मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवला. खंडाळा तालुक्‍यातील प्रश्‍न आजही तसेच आहेत. त्यांच्या निष्क्रियतेला इथली जनता कंटाळली असून परिवर्तनाच्या मानसिकतेत आहे.

माझ्या उमेदवारीमुळे मतविभागणीचा विरोधकांना फायदा आणि महायुतीचे उमेदवार मदन भोसले यांना तोटा होऊ नये आणि परिवर्तनासाठीच या निवडणुकीत माझी अपक्ष उमेदवारी मागे घेतली, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि वाई विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मदन भोसले यांच्या प्रचारासाठी खंडाळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाच्या दौऱ्यात अतीट येथील कोपरा सभेत ते बोलत होते. मदन भोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव जाधव-पाटील, रघुनाथराव जाधव, अनिरूद्ध गाढवे, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव, राहुल घाडगे, भाजपचे खंडाळा तालुकाध्यक्ष राहुल हाडके, शेतकरी संघटनेचे प्रमोद जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित यादव, तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, अंकुश पवार, प्रदीप माने, अतुल पवार व मित्रपक्षंचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, खंडाळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात शेती डोंगरदऱ्यात आहे. डुकरांमुळे या भागातील पिकांचे नुकसान होते. रस्त्यांची चाळण झाली आहे. वीज, पाणी या समस्या जनतेच्या पाचवीला पुजल्या आहेत. तालुक्‍यात औद्यागिक क्रांती होऊनही भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही. गावागावात आणि भावकीत भांडणे लावून विद्यमान लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत आपली राजकीय पोळी भाजली. त्यांनी जनतेची दिशाभूल केली.
खंडाळा तालुका नेहमीच विधानसभेच्या प्रतिनिधित्वापासून उपेक्षित राहिला आहे.

वाई विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माझी उमेदवारी निश्‍चित होईल, असे वाटत होते. मात्र, मदन भोसले यांचे सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्य, विकासाचा दृष्टिकोन पाहून महायुतीच्या चर्चेत हा मतदारसंघ भाजपकडे गेला. मदन भोसले यांना उमेदवारी मिळाली.

विधानसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी पक्षाकडून अन्याय होत असल्याच्या भावनेतून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, मदन भोसले यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याने मला उमेदवारी मागे घ्यावी लागली. या मतदारसंघातील जनतेच्या मनात रोष असून ती परिवर्तनाच्या मानसिकतेत आहे. त्याला गालबोट लागू नये आणि गेल्या दहा वर्षांतील विकासाचा अनुशेष महायुती सरकारच्या माध्यमातून भरून निघेल, या विश्‍वासातून माझी उमेदवारी मागे घेऊन मदन भोसले यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)