पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. हिंदू महासभेचे आनंद दवेही या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सध्या संपूर्ण पुण्यात याच निवडणुकीची चर्चा असताना, अश्यातच काल कवी मनाचे नेते आणि बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचं दिसून आलं आहे.
कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. दरम्यान, या सगळ्यात आता बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बिचुकले यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, अभिजीत बिचुकले यांना ही धमकी फोनवरून मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा…’ अशा धमक्या आपल्याला येत असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केल्या आहे. फोनवरून या धमक्या आल्यानंतर बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रं लिहून त्याबाबतची तक्रार केली आहे. तसेच आपल्याला तातडीने संरक्षण देण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्याची मागणीही केली आहे.
कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अभिजित बिचुकले यांनी आव्हान दिल. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली.