गजानन चिंचवडे : आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण
पिंपरी – खासगी क्षेत्रातील येस बॅंकेवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल 984 कोटी रुपयांच्या ठेवी बॅंकेत अडकल्या आहेत. नागरिकांच्या कररुपातून जमा झालेले पैसे राष्ट्रीयकृत बॅंकेत ठेवणे बंधनकारक असताना एवढी मोठी रक्कम कोणाच्या परवानगीने खासगी बॅंकेत गुंतविली असा प्रश्न उपस्थित करत याबाबत खुलासा करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. महापालिकेने ठेवी राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये ठेवणे अपेक्षित आहे.
महापालिकेच्या आजमितीला किती ठेवी आहेत? कोणत्या-कोणत्या बॅंकेत ठेवी ठेवल्या आहेत? या रकमांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का? महापालिकेची अर्थिक परिस्थिती काय आहे? नागरिकांच्या कररुपाने उभा राहिलेला पैसा जपणे महापालिकेचे कर्तव्य आहे. करदात्यांचा पैसा कोणाच्या घशात जावू नये, याची महापालिकेने दक्षता घेणे आवश्यक आहे.
याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कारण कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अर्थिक शिस्त व नियमाने चालल्यास त्याचा भविष्यात विकासकामांवर चांगलाच परिणाम होईल. त्यामुळे आयुक्तांनी करदात्या नागरिकांना त्याचे जाहीर प्रगटन करावे, अन्यथा शिवसेनेला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा चिंचवडे यांनी आयुक्तांना दिला आहे.